

ICC Rankings Smriti Mandhana Drop South Africa Captain laura number 1
दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या महिला क्रिकेटच्या ताज्या क्रमवारीत मोठे बदल झाले आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत फटका बसला असून तिला एका स्थानाचा तोटा झाला आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
स्मृती मानधनाच्या एकदिवसीय फलंदाज क्रमवारीत एका स्थानाने खाली सरकत आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज लॉरा वोल्वार्ड्ट हिने दोन स्थानांची भरारी घेत 814 रेटिंग गुणांसह आता पहिला क्रमांक पटकावला आहे.
याशिवाय, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत 4 स्थानांची मोठी झेप घेऊन ती 14 व्या स्थानावर पोहोचली आहे. तर जेमिमाह रॉड्रिग्स हिला 9 स्थानांचा जबरदस्त फायदा झाला आहे. तिने आता टॉप-10 मध्ये एन्ट्री घेतली आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीय (T20I) गोलंदाजी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना सर्वाधिक फायदा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेची डावखुरी फिरकी गोलंदाज नॉनकुलुलेको म्लाबा हिने आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दमदार कामगिरीमुळे थेट 4 स्थानांची झेप घेतली आहे. ती आता सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे आणि ऑस्ट्रेलियाची विद्यमान नंबर-1 टी-20 गोलंदाज ॲनाबेल सदरलँडपेक्षा फक्त 31 गुणांनी मागे आहे.
भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा आणि पाकिस्तानची सादिया इक्बाल या दोघी 732 रेटिंग गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर कायम आहेत.
टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीतही काही बदल दिसून आले आहेत. श्रीलंकेची चमारी अट्टापट्टू एका स्थानाच्या फायद्यासह सहाव्या स्थानावर पोहोचली आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने टी-20 फलंदाजी क्रमवारीत एक स्थान सुधारून ती 15 व्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी (794 रेटिंग गुण) टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे.
एकंदरीत, दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ICC क्रमवारीमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे, तर भारतीय खेळाडू स्मृती मानधना हिला जरी एकदिवसीय क्रमवारीत तात्पुरता फटका बसला असला तरी, हरमनप्रीत आणि जेमिमाह यांच्या प्रगतीमुळे भारतीय चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.