

ipl 2026 mini auction youngest and oldest players bidding 16 december
मुंबई : जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेल्या IPL 2026 मिनी लिलावाचा अंतिम पडदा आता उघडणार आहे. बीसीसीआयने (BCCI) 1355 खेळाडूंमधून केवळ 350 जणांची अंतिम यादी जाहीर केली आहे. येत्या 16 डिसेंबर रोजी अबू धाबी येथील एतिहाद अरेना येथे हा लिलावाचा सोहळला रंगणार असून, यात केवळ 77 स्लॉट्ससाठी बोली लागतील.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या मिनी लिलावासाठी (Mini Auction) क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे. येत्या 16 डिसेंबर रोजी होणाऱ्या या लिलावात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समन्वय साधत संघ मालकांमध्ये खेळाडूंच्या खरेदीसाठी मोठी स्पर्धा रंगणार आहे. यंदाच्या लिलावात 18 वर्षांच्या ताज्या दमाच्या तरुणांपासून ते 39 वर्षांच्या अनुभवी खेळाडूंपर्यंत एकूण 350 खेळाडू आपले नशीब आजमावणार आहेत.
या लिलावातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे 72 टक्के खेळाडू 21 ते 30 या वयोगटातील आहेत.
21 ते 30 वर्षे : 72%
31 ते 39 वर्षे : 20%
18 ते 20 वर्षे : 8% (यात 18 वर्षांचे 3 आणि 19 वर्षांचे 12 खेळाडू सामील आहेत)
अफगाणिस्तानचा युवा क्रिकेटपटू वाहिदुल्लाह जादरान (वय: 18 वर्षे 13 दिवस) हा या लिलावातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याच्यासह भारताचे साहिल पारख आणि आर.एस. अम्ब्रिश हेदेखील केवळ 18 वर्षांचे आहेत आणि त्यांची बेस प्राइस 30-30 लाख आहे.
वाहिदुल्लाह जादरान (अफगाणिस्तान) : 18 वर्षे 13 दिवस
साहिल पारख : भारत : 18 वर्षे 6 महिने 2 दिवस
आर.एस. अम्ब्रिश (भारत) : 18 वर्षे 6 महिने 11 दिवस
दुसरीकडे, भारताचा जलज सक्सेना (39 वर्षे) हा यंदाच्या लिलावातील सर्वात वयस्कर खेळाडू आहे. जलजची लिलावासाठीची बेस प्राइस 40 लाख आहे. त्याच्यासोबत 38 वर्षीय कर्ण शर्मा, उमेश यादव आणि इंग्लंडचा रिचर्ड ग्लीसन हे देखील लिलावात उपलब्ध असतील.
जलज सक्सेना (वय 39 वर्षे) : भारत : बेस प्राइस 40 लाख
कर्ण शर्मा (वय 38 वर्षे) : भारत : बेस प्राइस 50 लाख
उमेश यादव : (वय 38 वर्षे) : भारत : बेस प्राइस 1 कोटी 50 लाख
रिचर्ड ग्लीसन (वय 38 वर्षे) : इंग्लंड : बेस प्राइस 75 लाख
या मिनी लिलावात एकूण 350 खेळाडू असून, दहा संघांमध्ये मिळून केवळ 77 स्लॉट्स (ज्यात 31 विदेशी खेळाडूंसाठी आरक्षित) भरायचे आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक संघ काळजीपूर्वक बोली लावणार हे निश्चित.
कोलकाता नाइट रायडर्स (KKR)च्या पर्समध्ये (64.30 कोटी) सर्वात मोठी रक्कम उपलब्ध आहे आणि त्यांना सर्वाधिक 13 खेळाडू (6 विदेशी) खरेदी करायचे आहेत. याउलट, मुंबई इंडियन्सच्या (MI) पर्समध्ये (2.75 कोटी) सर्वात कमी रक्कम आहे. त्यांना केवळ 5 खेळाडू घ्यायचे आहेत.
कोलकाता नाइट रायडर्स (KKR) : कोलकाता नाइट रायडर्सकडे सर्वाधिक 64.3 कोटींची पर्स उपलब्ध आहे, ज्याद्वारे ते 13 खेळाडू खरेदी करू शकतात, ज्यात 6 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
चेन्नई सुपर किंग्स (CSK) : गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सकडे 43.4 कोटी इतकी मोठी रक्कम शिल्लक आहे आणि त्यांना एकूण 9 खेळाडू (4 विदेशी) खरेदी करायचे आहेत.
सनरायझर्स हैदराबाद (SRH) : सनरायझर्स हैदराबादच्या पर्समध्ये 25.5 कोटी आहेत. त्यांना 10 स्लॉट्स भरायचे आहेत, ज्यात केवळ 2 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
दिल्ली कॅपिटल्स (DC) : दिल्ली कॅपिटल्सकडे 8 स्लॉट्स उपलब्ध आहेत, ज्यात सर्वाधिक 5 विदेशी स्लॉट्सचा समावेश आहे, यासाठी ते 21.80 कोटी खर्च करू शकतील.
लखनऊ सुपर जायंट्स (LSG) : लखनऊ सुपर जायंट्सकडे 22.95 कोटी पर्समध्ये आहेत, आणि ते 6 खेळाडू खरेदी करू शकतील, ज्यात 4 विदेशी खेळाडूंसाठी जागा आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडे 8 स्लॉट्स (2 विदेशी) भरण्यासाठी 16.4 कोटी उपलब्ध आहेत.
राजस्थान रॉयल्स (RR) : राजस्थान रॉयल्स 16.05 कोटींसह 9 खेळाडू खरेदी करू शकते, परंतु त्यांच्याकडे फक्त 1 विदेशी स्लॉट रिक्त आहे.
गुजरात टायटन्स (GT) : गुजरात टायटन्सकडे 5 स्लॉट्स उपलब्ध आहेत, ज्यात 4 विदेशी स्लॉट्स भरण्यासाठी त्यांच्या पर्समध्ये 12.9 कोटी शिल्लक आहेत.
पंजाब किंग्स (PBKS) : पंजाब किंग्सकडे सर्वात कमी 4 स्लॉट्स भरायचे आहेत, यासाठी ते 11.5 कोटी खर्च करू शकतात.
मुंबई इंडियन्स (MI) : सर्वात कमी 2.75 कोटी पर्ससह मुंबई इंडियन्सकडे केवळ 5 स्लॉट्स उपलब्ध आहेत, ज्यात फक्त 1 विदेशी खेळाडूचा स्लॉट रिक्त आहे, ज्यामुळे त्यांच्याकडे मोठ्या बोलीची शक्यता कमी आहे.
सर्वात जास्त खेळाडूंनी 30 लाख या सर्वात कमी बेस प्राइस ब्रॅकेटची निवड केली आहे, ज्यात एकूण 227 खेळाडू आहेत. तर, सर्वाधिक बेस प्राइस (2 कोटी) असलेल्या गटात 40 खेळाडू आहेत, ज्यात मोठे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले खेळाडू आहेत.
आता या मिनी लिलावात संघ मालकांकडून युवा खेळाडूंवर अधिक विश्वास दाखवला जातो की अनुभवाला अधिक प्राधान्य दिले जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.