

प्रत्येक चेंडूला वाढणारी उत्कंठा, फलंदाजांचे चाहत्यांना आवाक करणारी फटकेबाजी, गोलंदाजांना प्रत्येक चेंडूसाठी वापरावे लागणारे 'बुद्धिबळ' आणि अवघ्या एक किंवा दोन षटकांमध्ये सामन्यांच्या निकालाचे चित्र बदलण्याची शक्यता हे सारं काही केवळ टी 20 क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. क्रिकेटमधील सर्वात थरारक आणि रोमहर्षक प्रारुपाचे पहिला विश्वचषक (२००७) भारताने जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली होती. आज पुन्हा एका टीम इंडिया भारत २००७ च्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार की, आपल्या नावावरील 'चोकर्स' हे नामुष्कीचे बिरुद दक्षिण आफ्रिका पुसणार का, याकडे क्रिकेट जगताचे लक्ष वेधले आहे.
यंदाच्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत व दक्षिण आफ्रिका हे दोनच संघ अपराजित राहिले आहेत. त्यामुळेच ही तुल्यबळ लढत लक्षवेधी ठरली आहे. दोन्ही संघ आपले सर्वस्व पणाला लावण्यासाठी सज्ज झाले आहेत. दक्षिण आफ्रिकन संघ आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेतील आपल्या पहिल्यावहिल्या जेतेपदासाठी महत्त्वाकांक्षी असेल तर भारताला येथे खुणावत असेल तो १३ वर्षे सातत्याने हुलकावणी देत असलेला आयसीसीचा विश्वचषकावर आपल्या नावाची मोहर उमटविण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.
या स्पर्धेतील आतापर्यंतची वाटचाल पाहता भारताचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास अधिक कस लागलेला आहे. दक्षिण आफ्रिकेने साखळी फेरीत बांगला देश, श्रीलंका, नेदरलँड, नेपाळ यांच्याविरुद्ध तर सुपर-8 फेरीत अमेरिका व इंग्लंड यांच्याविरुद्ध विजय मिळवले. नंतर पहिल्या उपांत्य लढतीत अफगाणचा धुव्वा उडवत ते अंतिम फेरीत पोहोचले. त्या तुलनेत भारताने ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसारख्या तगड्या संघाला धूळ चारल्यानंतर उपांत्य फेरीत इंग्लंडचे आव्हान मोडीत काढत अंतिम फेरीत धडक मारली आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने सलग तिसर्या आयसीसी स्पर्धेतच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने कसोटी चॅम्पियनशिप आणि वन-डे विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. आता सलग टीम इंडियाला तिन्ही फॉरमॅटमध्ये आयसीसी टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत पोहोचवणारा रोहित शर्मा हा भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे. यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माची फलंदाजी बहरली आहे. ची ऑस्ट्रेलियाविरुद्ध 41 चेंडूंत 92 धावांची तडाखेबंद खेळी आणि त्यानंतर उपांत्य फेरीत प्रतिकूल परिस्थितीतील 57 धावांची जिगरबाज खेळी निव्वळ वाखाणण्याजोगी ठरली. आजही असाच फ्लाईंग स्टार्ट मिळवून देणे ही त्याची महत्त्वाकांक्षा पहिल्या षटकापासूनच दिसून येऊ शकते. कसोटी आणि वन-डे विश्वचषक स्पर्धेत स्वप्नभंग झालेला रोहित शर्मा स्वत:सह कोटयवधी भारतीयांची स्वप्नपूर्ती करणार का? याकडे क्रिकेट जगताचे लक्ष वेधले आहे.
जागतिक स्तरावरील दिग्गज फलंदाजांना सळो की पळो करून सोडण्यात माहीर असणारा जसप्रीत बुमराह आजच्या लढतीत भारतीय क्रिकेट संघासाठी खर्या अर्थाने पुन्हा ट्रम्प कार्ड ठरू शकतो. या दिग्गज गोलंदाजाने आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांत 13 बळी घेतले आहेत.
बार्बाडोसमधील हा नववा सामना असणार आहे. येथील पहिला सामना सुपर ओव्हरपर्यंत रंगला होता. त्यानंतर मात्र येथील सर्व सामने एकतर्फी झाले आहेत. नंतरचे 4 पैकी 3 सामने प्रथम फलंदाजी करणार्या संघाने जिंकले आहेत. त्यानंतर चौथ्या लढतीत स्कॉटलंडने इंग्लंडविरुद्ध 10 षटकांत बिनबाद 90 धावा, अशी सुरुवात केल्यानंतर ती लढत पावसामुळे रद्द करावी लागली होती.
, ,,,