India has decided to settle all accounts in this World Cup.
IND vs SA T20 WC 24 Final ICC T20 WC Trophy

IND vs SA T20 WC 24 Final : सायमन गो बॅक...

सायमन गो बॅक...
निमिष पाटगावकर

भारताने या विश्वचषकात सर्व हिशेब चुकते करायचे ठरवले आहे. सेंट ल्युसियाला ऑस्ट्रेलियाचा हिशेब चुकता केल्यावर गुरुवारी उपांत्य फेरीच्या सामन्यात जॉर्जटाऊन गयानाला टीम इंडियाने इंग्लंडकडून लगान वसूल केला. मला आठवतंय त्या अ‍ॅडलेडच्या 2022 च्या सामन्याला जाताना मी त्या सामन्याला अ‍ॅडलेड ओव्हलच्या दारात असलेल्या चर्चला नमस्कार करून गेलो होतो. कारण विजय हजारेंनी इथे प्रार्थना केल्यावर 1948 च्या कसोटीत त्यांच्यावर अ‍ॅडलेड प्रसन्न झाले होते. माझीच काय हजारो भारतीय प्रेक्षकांची प्रार्थना तेव्हा देवाने ऐकली नाही, पण गुरुवारी मात्र गयानाला देवाने तथास्तु म्हटले. रोहित शर्माने लिडिंग फ्रॉम फ्रंट नेतृत्व दाखवत इंग्लंडला धूळ चारली आणि अजून एका विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी प्रवेश नक्की केला. जागतिक कसोटी अजिंक्यपद, 2023 चा विश्वचषक आणि आता हा असे गेल्या साधारण वर्षभरात आपण तिसर्‍यांदा आयसीसी चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलो आहोत.

हा विजय भारताने अगदी सहज मिळवला असे वाटले असले तरी हा विजय सहज नव्हता. या खेळपट्टीवर भारताने विशेषतः रोहित शर्मा आणि सूर्याने दाखवलेली फलंदाजीतील प्रगल्भता आणि कल्पकता इंग्लिश फलंदाजांना दाखवता आली नाही.

मी गयानाला बुधवारी पोहोचलो तेव्हा आधीचे दोन दिवस पडलेल्या पावसाची डबकी रस्त्याच्या बाजूला साचलेली दिसत होती, पण बुधवारी पाऊस नव्हता आणि संघाने सरावही केला होता. गुरुवारी सामन्याच्या दिवशी सकाळी मात्र पावसाने हजेरी लावली. मी स्टेडियमला पोहोचलो तेव्हा ढगांच्या गडगडाटाने माझे स्वागत केले आणि काही मिनिटांतच आडोसा शोधायला लागला. इतका मुसळधार पाऊस आला. या सामन्याला राखीव दिवस नव्हता, पण तब्बल 250 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला होता तेव्हा पाऊस थांबला तर सामना होणार हे नक्की होते. पावसाने सामना रद्द झाला असता तर नियमाप्रमाणे आपण विजेते घोषित झालो असतो, पण अशा विजयापेक्षा इंग्लंडला खेळून हरवल्याचे समाधान जास्त आहे.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून अपक्षेप्रमाणे क्षेत्ररक्षण घेतले. आकाशातल्या ढगांनी इंग्लंडला अगदी घरचे वातावरण दिले होते. त्याचा फायदा जलदगती गोलंदाजांनी उठवायला आणि पावसाने डकवर्थ ल्युईस लागला तर लक्ष्य माहीत असायला त्यांचा क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय योग्य होता. इथे फलंदाजी करणे नक्कीच सोपे नव्हते. चेंडू बॅटवर थांबून येत होता तर कधी खाली बसत होता. पावसामुळे आऊटफिल्ड मंदावले होते. या परिस्थितीत क्षेत्ररक्षकांमधून चेंडू काढत चौकार मिळवणे तसेच एकेरी-दुहेरीने धावफलक हलता ठेवणे गरजेचे होते. रोहित शर्माने टोपलीच्या चेंडूला चौकाराची टोपली दाखवत त्याच्या आक्रमक पावित्र्याची सूचना दिली. कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने षटकार मारून चांगली सुरुवात जरी केली तरी कोहली चक्क चाचपडत होता. कोहलीने अंदाधुंद आक्रमणाचा पावित्रा घेतला होता. निव्वळ टी-20 चा सलामीवीर म्हणून तो अतिरिक्त धोके घेताना दरवेळी बाद होतोय. वास्तविक कोहलीने आपला नैसर्गिक खेळ खेळणे अपेक्षित आहे. त्याला एका मोठ्या खेळीची आवश्यकता आहे हे म्हणत आपण आता या स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलो आहोत. ऋषभ पंत बाद झाला तो चेंडूही अपेक्षेप्रमाणे त्याच्या बॅटवर आला नाही आणि त्याचा झेल उडाला.

पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा व्यत्यय आला तेव्हा भारताने 2 गडी गमावून 65 धावा केल्या होत्या. या क्षणी इंग्लंडला भारतीयांना खिंडीत गाठणे गरजेचे होते, पण ते तसे नाहीत. रोहित शर्मा कधी नजाकतीने तर कधी पॉवर हिटर बनत धावा काढत होता. दुसरीकडून त्याला सूर्याची उत्तम साथ लाभली होती. या दोघांचे प्लेसमेंटस् इंग्लंडपासून सामना दूर नेत होते. या दोघा मुंबईकरांना जणू काही कांगा लीगमध्ये खेळल्यासारखे इथे खेळायचे होते. खेळपट्टीत दमटपणा होता, आऊटफिल्ड चेंडू सीमापार न्यायला साथ देत नव्हते तेव्हा फटक्यांची निवड आणि प्लेसमेंट याला अतोनात महत्त्व होते. या दोघांनी ते इतके सहज केले की फलंदाजी सोपी वाटेल असा भ्रम कुणाच्या मनात होऊ शकेल. या खेळपट्टीवर 150 ते 160 धावा विजयी ठरल्या असत्या, पण अखेरच्या षटकांतील पंड्या आणि जडेजाच्या फटकेबाजीने भारताने 171 पर्यंत मजल मारली. शिवम दुबेच्या ऐवजी जडेजाला फलंदाजीला पाठवायचा निर्णयही मास्टरस्ट्रोक ठरला. भारतीयांनी कुठच्या गोलंदाजांना ठरवून फटकावून काढायचे हे ठरवून धावांचा डोंगर उभा केला.

इंग्लंडला या सामन्यात परतण्यासाठी उत्तम सलामी आणि जोडीला बेअरस्टो, ब्रुक आणि लिव्हिंगस्टोन या सर्वांनी हातभार लावणे गरजेचे होतेे, पण भारतीय फिरकीपटूंनी या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर धुमाकूळ घातला आणि भारताला अंतिम सामन्याचे दरवाजे उघडून दिले. अक्षरने पहिल्या पॉवर प्लेमध्येच सामना भारताच्या हातात आणून दिला. रिव्हर्स स्विपसारखे आत्मघातकी फटके फलंदाज का खेळतात हा मोठा अजब प्रश्न आहे. बटलरने आपला बळी काढून दिला आणि इंग्लंडच्या डावाला खिंडार पडले. बटलर बाद झाला तरी धोका टळला नव्हता. पुन्हा भारताचे हुकमी अस्त्र बुमराहच्या हातातून लक्षवेधी चेंडू निघाला. यावेळी त्याने चेंडूचा वेग कमी कमी करून ऑफकटरवर सॉल्टला चकवले. सॉल्टची बॅट हवेत फिरली पण नुसतीच. सॉल्टचा त्रिफळा उडाला आणि साहेबाची फलंदाजी अळणी झाली. बेअरस्टोला अक्षरचा खाली राहिलेला चेंडू कळलाच नाही आणि जेव्हा त्रिफळा उडाला तेव्हा हताशपणे तो बघत बसला. दुसरीकडून कुलदीप इंग्लिश फलंदाजांना सतावत होता. दोन फिंगर स्पिनर आणि एक रिस्ट स्पिनर इंग्लिश फलंदाजांची दाणादाण उडवत होते. कुलदीप प्रत्येक विश्वचषकात एक असा चेंडू टाकतो त्याला ‘बॉल ऑफ द टूर्नामेंट’ म्हणता येते. 2019 ला तो बाबरचा बळी घेणारा होता तर परवा ब्रुकचा बळी घेणारा चेंडू या विश्वचषकातला सर्वोत्तम चेंडू होता. आधीच्या चेंडूला चौकार मारल्यावर कुलदीपने लाईन बदलून लेग स्टम्पच्या रोखाने फ्लिपर टाकला. पुन्हा रिव्हर्स स्विप मारायच्या फंदात टायचे स्टम्प आणि इंग्लंडच्या उरल्यासुरल्या आशा नष्ट झाल्या. या स्पर्धेत आतापर्यंत पराभूत न झालेले दोन संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत. 1991 मध्ये पुन्हा क्रिकेटजगतात प्रवेश केल्यावर आजपर्यंत त्यांना कुठल्याही वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठता आली नव्हती, तेव्हा हा सामना पुन्हा एकदा क्रिकेटबरोबरच मानसिक कणखरतेचा असेल. ऑस्ट्रेलियाला आपण दणदणीत हरवले आणि इंग्लिश साहेबाला ‘सायमन गो बॅक’ हे ठणकावून सांगितले. हे नुसते विजय नव्हते तर भारताच्या करोडो प्रेक्षकांच्या भळभळत्या जखमांवरचे रामबाण औषध होते.

logo
Pudhari News
pudhari.news