

ICC confirms hosting rights for the next three WTC finals ECB host events
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे एक सत्र दोन वर्षांचे असते. या कालावधीत विविध संघ एकमेकांविरुद्ध कसोटी मालिका खेळतात आणि दुस-या वर्षांच्या अखेरीस WTC गुणतालिकेत अव्वल दोन स्थानी असलेल्या संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जातो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे आतापर्यंत तीन अंतिम सामने झाले असून, हे तिन्ही सामने इंग्लंडमध्येच खेळवण्यात आले आहेत. सध्या WTC चे चौथे सत्र सुरू असून, त्याचा अंतिम सामना 2027 मध्ये रंगणार आहे.
आता आयसीसीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे की, आगामी तीन WTC अंतिम सामन्यांचे (2027, 2029 आणि 2031) यजमानपद इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडे असेल. त्यामुळे, आगामी तीनही WTC अंतिम सामने इंग्लंडच्या भूमीवरच होणार यावर आयसीसीने शिक्कामोर्तब केले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 चा अंतिम सामना भारतात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आपली वार्षिक बैठक सिंगापूर येथे आयोजित केली. या बैठकीत अफगाण वंशाच्या विस्थापित महिला क्रिकेटपटूंना पाठिंबा देण्यासंबंधित प्रगती, भारतात होणारा आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 आणि इंग्लंडमध्ये होणारा आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 यांसारख्या प्रमुख आयसीसी स्पर्धांवर चर्चा करण्यात आली. याच बैठकीत आयसीसीने पुढील तीन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या यजमानपदावरही निर्णय घेतला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा पहिला अंतिम सामना 2021 मध्ये इंग्लंडमधील साऊथम्प्टन येथे खेळवण्यात आला होता, ज्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा 8 गडी राखून पराभव केला. त्यानंतर WTC 2023-25 चा अंतिम सामना लॉर्ड्सच्या मैदानावर झाला, ज्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 5 गडी राखून पराभूत केले. WTC 2025 चा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून विजय मिळवत जिंकला.