

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 19 वर्षांखालील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, पहिल्या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करून 8 बळी मिळवणाऱ्या, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याचा मुलगा सुपुत्र आर्ची वॉनला संघातून वगळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. केवळ इतकेच नव्हे, तर इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी आपला कर्णधारही बदलला आहे.
टीम इंडियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचे नेतृत्व हमजा शेख याने केले होते. मात्र, दुसऱ्या कसोटीसाठी त्यांच्या जागी थॉमस रीव याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. थॉमस रीव याने भारताविरुद्धच्या 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही संघाचे नेतृत्व सांभाळले होते. दरम्यान, कर्णधारपदावरून हटवण्यात आलेल्या हमजा शेख यांना दुसऱ्या कसोटीसाठी संघातूनही वगळण्यात आले आहे.
इंग्लंडचा माजी दिग्गज क्रिकेटर कर्णधार मायकल वॉन याचा मुलगा आर्ची वॉन याला पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजीत विशेष यश मिळाले नाही, परंतु गोलंदाजीत त्याने आपली क्षमता सिद्ध केली होती.
पहिला डाव : टीम इंडियाविरुद्धच्या पहिल्या डावात त्यांनी 17 षटकांत 108 धावा देत 2 बळी मिळवले होते. यात त्याने भारताचे कर्णधार आयुष म्हात्रे आणि मौल्यराजसिंह चावडा यांना बाद केले.
दुसरा डाव : दुसऱ्या डावात आर्चीने अधिक प्रभावी गोलंदाजी करत 6 भारतीय फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. त्यांनी 25 षटकांत 84 धावा देत 6 बळी घेतले. दुसऱ्या डावात त्यांनी वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे, मौल्यराजसिंह चावडा, मोहम्मद एनान, हेनिल पटेल आणि दीपेश देवेंद्रन यांना बाद केले.
एकंदरीत, आर्ची यांने दोन्ही डावांत मिळून एकूण 8 बळी घेतले. विशेष म्हणजे, त्याने कर्णधार आयुष म्हात्रे आणि मौल्यराजसिंह चावडा यांना दोन्ही डावांत बाद करण्याची कामगिरी केली होती. अशा उत्कृष्ट कामगिरीनंतरही त्याला संघात स्थान न मिळाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
इंग्लंडचा 19 वर्षांखालील संघ
थॉमस रीव (कर्णधार), रॉकी फ्लिंटॉफ, राल्फी अल्बर्ट, विल बेनिसन, ॲडम थॉमस, ॲलेक्स फ्रेंच, बेन डॉकिन्स, ॲलेक्स ग्रीन, जो हॉकिन्स, जॅक होम, बेन मेयस, जेम्स मिंटो, आर्यन सावंत, जय सिंग.
भारताचा 19 वर्षांखालील संघ
आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, कनिष्क चौहान, मौल्यराजसिंह चावडा, राहुल कुमार, आर. एस. अंबरीश, हरवंश पंगालिया (यष्टीरक्षक), विहान मल्होत्रा, दीपेश देवेंद्रन, युद्धजीत गुहा, नमन पुष्पक, अनमोलजीत सिंग, हेनिल पटेल, अभिज्ञान कुंडू, मोहम्मद एनान, प्रणव राघवेंद्र.