

ind vs eng 4th test manchester test match team india playing 11
मँचेस्टर : इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-2 अशा फरकाने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतींनी ग्रासले आहे. 23 जुलैपासून मँचेस्टर येथे सुरू होणाऱ्या महत्त्वपूर्ण कसोटी सामन्यापूर्वी संघ व्यवस्थापनासमोर अंतिम 11 खेळाडू निवडण्याचे मोठे आव्हान आहे. या सामन्यात भारतीय संघ किमान तीन बदलांसह मैदानात उतरण्याची दाट शक्यता असून, करुण नायर, आकाशदीप आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या जागी अनुक्रमे साई सुदर्शन, ध्रुव जुरेल आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी दिली जाऊ शकते.
मँचेस्टर कसोटीपूर्वी वेगवान गोलंदाज आकाशदीप आणि अर्शदीप सिंग हे दुखापतग्रस्त झाले आहेत. अर्शदीप सिंगच्या डाव्या हाताला टाके पडले असल्याने त्याचे या सामन्यात खेळणे अनिश्चित आहे. तर आकाशदीप मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे त्रस्त असून, तोदेखील संघाबाहेर जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, अंशुल कंबोज याला भारतीय संघात सामील करण्यात आले आहे.
यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याच्या बोटाला दुखापत झाली असली तरी, तो सामना खेळणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र, तो यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळू शकेल की नाही, यावर साशंकता आहे.
करुण नायरच्या जागी साई सुदर्शन
भारतीय संघातील पहिला बदल आघाडीच्या फळीत होण्याची शक्यता आहे. मधल्या फळीतील फलंदाज करुण नायर मागील 6 डावांमध्ये विशेष कामगिरी करू शकलेला नाही. त्याच्या जागी युवा फलंदाज साई सुदर्शनला संधी मिळू शकते. साईने पहिल्या कसोटीत पदार्पण केले होते, परंतु संघात अष्टपैलू खेळाडूंना प्राधान्य देण्याच्या रणनितीमुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले होते. करुण नायरला वगळल्यास, तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी साई सुदर्शन प्रबळ दावेदार आहे.
सुंदरच्या जागी जुरेल
जर ऋषभ पंत केवळ फलंदाज म्हणून खेळला, तर यष्टीरक्षक म्हणून ध्रुव जुरेलला संघात स्थान मिळू शकते. भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोएशेट यांनी यापूर्वीच पंतला केवळ फलंदाज म्हणून खेळवण्याचे संकेत दिले आहेत. अशा परिस्थितीत, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संघाबाहेर बसावे लागू शकते. मँचेस्टरमधील हवामान पाहता, वेगवान गोलंदाजीला अनुकूल परिस्थितीमुळे नितीश कुमार रेड्डी यालाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच कारणामुळे फिरकीपटू कुलदीप यादवला आणखी एका सामन्यासाठी संघाबाहेर राहावे लागण्याची शक्यता आहे.
आकाशदीप की प्रसिद्ध कृष्णा?
वेगवान गोलंदाज आकाशदीप दुखापतीमुळे खेळू न शकल्यास, त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तो मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळला होता. अर्शदीप सिंग टाके पडल्यामुळे खेळणार नाही. अंशुल कंबोज हा एक पर्याय असला तरी, संघात सामील होताच त्याला थेट अंतिम 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांचे संघातील स्थान निश्चित आहे. याव्यतिरिक्त, शार्दुल ठाकूर हादेखील एक पर्याय असून तो गोलंदाजीसोबतच फलंदाजीमध्येही योगदान देऊ शकतो.
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करुण नायर/साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर/ध्रुव जुरेल, आकाशदीप/प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.