

duleep trophy 2025 central zone captain rajat patidar hit century
दुलीप ट्रॉफीला सुरुवात झाली असून या नावाजलेल्या स्पर्धेत अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत खेळाडू सहभागी खेळताना दिसत आहेत. दुलीप ट्रॉफी ही स्पर्धा भारतीय संघात प्रवेश करण्याचा एक मार्ग आहे, ज्याचा खेळाडू पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, आपल्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये आरसीबीला पहिलेवहिले विजेतेपद मिळवून देणाऱ्या रजत पाटीदारने शानदार शतकी खेळी साकारण्याचे काम केले आहे.
दुलीप ट्रॉफीमध्ये रजत पाटीदार सेंट्रल झोनचे नेतृत्व करत आहे. संघाचा पहिला सामना गुरुवारी (दि. 28) नॉर्थ ईस्ट झोन विरुद्ध सुरू झाला आहे. सेंट्रल झोन संघाची पहिली विकेट लवकर पडली. त्यावेळी संघाची धावसंख्या चार होती. त्यानंतर लवकरच दुसरा झटका बसला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या दानिश मालेवारने प्रथम आपले शतक पूर्ण केले. तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला मैदानात उतरलेल्या कर्णधार रजत पाटीदारनेही उत्तम शैलीत फलंदाजी करून शतकाचा खास टप्पा गाठला.
रजत पाटीदारच्या शतकाची खास गोष्ट म्हणजे त्याने एकदिवसीय शैलीत फलंदाजी न करता टी-20 सारखा आक्रमक पवित्रा अवलंबला. त्याने 85 चेंडूंत 111 धावा तडकावल्या. या दरम्यान त्याने 20 चौकार आणि दोन षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट 130 च्या जवळ होता. रेड बॉल क्रिकेटमध्ये असा स्ट्राईक रेट क्वचितच पाहायला मिळतो.
रजत पाटीदारने आतापर्यंत टीम इंडियासाठी तीन कसोटी आणि एक एकदिवसीय सामना खेळला आहे. मात्र, तो आता संघाबाहेर आहे. त्याला टी-20 संघातही स्थान मिळालेले नाही. रजतने भारतासाठी तीन कसोटी सामन्यांमध्ये 63 आणि एका एकदिवसीय सामन्यात 22 धावा केल्या आहेत.
गेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विदर्भाकडून शतक झळकावून दानिश मालेवार प्रसिद्धीझोतात आला होता. त्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने २८५ चेंडूत १५३ धावा फटकावल्या होत्या. दुसऱ्या डावातही त्याने शानदार अर्धशतकी (७३ धावा) खेळी केली होती. त्या सामन्यात विदर्भाने केरळचा पराभव केला आणि रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले.
या सामन्यात ईशान्य झोन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरू होण्यापूर्वीच सेंट्रल झोनला मोठा धक्का बसला. ध्रुव जुरेल दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडला. यापूर्वी, जुरेलला सेंट्रल झोनचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते परंतु आता त्याच्या अनुपस्थितीत, रजत पाटीदार संघाचे नेतृत्व करत आहे. आता सेंट्रल झोन संघ हा सामना जिंकून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्न करेल.