

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा स्वत:च्या तंत्रावर (टेक्निक) अजूनही समाधानी नाही. त्याने याबाबत खुलासा केला आहे. मे महिन्यात दोहा डायमंड लीगमध्ये निरजने ९० मीटरपेक्षा अधिक (९०.२३ मीटर) दूर भालाफेकला होता. मात्र, त्याच्या मते, ती फेक ‘परिपूर्ण’ नव्हती. २७ वर्षीय नीरजने १६ मे रोजी हंगामातील पहिली स्पर्धा खेळताना ९०.२३ मीटर दूर भाला फेकत, अनेक वर्षांपासूनचे ९० मीटरचे लक्ष्य यशस्वीरित्या पार केले होते. आज (२८ ऑगस्ट) तो स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे डायमंड लीग फायनलमध्ये सहभागी होणार आहे.
नीरज म्हणाला, मी अजूनही शिकण्याच्या प्रक्रियेत असून स्वत: चे तंत्र सुधारत आहे. यासाठी प्रशिक्षक जान जेलेझ्नी यांच्याकडून सातत्याने मार्गदर्शन घेत आहे. माझा धावण्याचा वेग खूप जास्त आहे, पण मी त्या वेगाचा योग्य वापर करू शकत नाही, जेणेकरून भाला आणखी दूर जाईल. दोहामधील ९० मीटरची फेक चांगली होती, पण तांत्रिकदृष्ट्या ती परिपूर्ण नव्हती असे मी म्हणेन. जर माझा डावा पाय सरळ राहिला आणि मी योग्य प्रकारे ब्लॉक करू शकलो, तर फेक आणखी चांगली होईल. तेव्हा मला माझ्या वेगाचा पूर्ण फायदा मिळेल आणि मला समाधान वाटेल. मी ९० मीटरचा अडथळा पार केला आहे, पण आता माझे लक्ष्य यापेक्षा जास्त फेक करण्याचे आहे.
दोन वेळा ऑलिंपिक पदक जिंकणारा नीरज चोप्रा या वर्षी पुन्हा एकदा डायमंड लीग ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेल. त्याने हा किताब २०२२ मध्ये जिंकला होता, पण २०२३ आणि २०२४ मध्ये तो उपविजेता राहिला. यंदाही फायनलमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे.
यंदाच्या स्पर्धेत नीरजचा सामना गतविजेता ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स आणि जर्मनीचा ज्युलियन वेबर यांच्याशी होईल. फायनलमध्ये एकूण सात खेळाडू सहभागी होत आहेत. यात २०१५ चा जागतिक विजेता केनियाचा ज्युलियस येगो, त्रिनिदाद टोबॅगोचा केशॉर्न वॉलकॉट, मोल्डोवाचा अँड्रियन मार्डारे यांनी गुणतालिकेतील पहिल्या सहामध्ये स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तसेच, यजमान स्वित्झर्लंडकडून सायमन व्हीलँड यालाही संधी देण्यात आली आहे.
डायमंड लीग फायनलची सुरुवात २८ ऑगस्ट रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री ११.१५ वाजता होईल. वाऱ्याच्या परिणामाबद्दल बोलताना नीरज चोप्रा म्हणाला, ‘भालाफेक सुरू झाल्यावर यात वारा हा महत्त्वाचा घटक आहे. खेळाडूला त्याच्या योग्य वापर करता आला तर त्याचा फायदा होतो. जर टेल विंड (मागून येणारा वारा) असेल तर चांगले असते. जर फेक योग्य रेषेत आणि थोडी वर केली, तर याचा खूप फायदा होतो. पण जर कोणी कमी उंचीने फेकला तर त्याचा फायदा होत नाही. तर हेडविंड (समोरून येणारा वारा) आमच्यासाठी कठीण असतो, कारण आम्हाला वेगाने धावावे लागते. जर कोणी उंचावरू भाला फेकला तर ती फेक चांगली दिसते. दोहामध्ये वारा खूपच अनुकूल होता.’