

मुंबई : भारत सरकारने ‘ऑनलाइन गेमिंग कायद्या’द्वारे ‘रियल मनी गेम्स’ व्यवसायावर नुकतीच घातलेली बंदी ही क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. या धोरणाचा परिणाम क्रिकेट विश्वातील प्रत्येक घटकावर होणार आहे. यामध्ये क्रिकेटपटूसह या गेमिंग कंपन्यांच्या आर्थिक पाठबळावर चालणाऱ्या जगभरातील उदयोन्मुख क्रिकेट लीग स्पर्धांना आर्थिक फटका सोसावा लागणार आहे.
'ड्रीम 11' (Dream11) या कंपनीने भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सी प्रायोजकत्वातून (sponsorship) माघार घेणे, हे क्रिकेटच्या अर्थव्यवस्थेला हादरा बसणारे एक उदाहरण आहे. ‘ड्रीम-11’, 'माय11सर्कल' (My11Circle) आणि इतर अनेक स्पर्धक कंपन्या विविध क्रिकेट स्पर्धांच्या प्रायोजकाची मध्यवर्ती भूमिका बजावत होत्या. यामध्ये जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट स्पर्धा असलेल्या ‘इंडियन प्रीमियर लीग’ (IPL) सोबतचे करार आणि विशेषतः भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) छत्राखालील अनेक दिग्गज खेळाडूंच्या जाहिरात करारांचा (endorsements) समावेश आहे.
‘क्रिकबझ’ (Cricbuzz) या संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, या बंदीमुळे काही भारतीय खेळाडूंना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दिग्गज क्रिकेटर फँटसी गेमिंग ॲप्सची जाहिरात कारायचे. या जाहिराती आणि प्रसिद्धी करारांचे मूल्य इतके मोठे आहे की, एकत्रितपणे भारतीय क्रिकेटपटूंना १५० ते २०० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश आहे.
विराट कोहली याला 'एमपीएल' (MPL) सोबतच्या करारातून वार्षिक १०-१२ कोटी रुपये मिळतात. तर रोहित शर्मा आणि एम. एस. धोनी यांना अनुक्रमे 'ड्रीम११' आणि 'विंझो' (Winzo)कडून वार्षिक ६-७ कोटी रुपये मिळतात. वार्षिक १ कोटी रुपयांपर्यंत कमाई करणाऱ्या युवा खेळाडूंचाही यात समावेश आहे. या सर्वांना जाहिरात उत्पन्नाच्या एका मोठ्या भागावर पाणी सोडावे लागणार आहे. दरम्यान, आता या फँटसी गेमिंग कंपन्या क्रिकेटमधून बाहेर पडून आपला व्यवसाय परदेशात वळवण्याची शक्यता आहे.
‘क्रिकबझ’च्या अहवालानुसार, काही खेळाडूंची जाहिरातींमधून होणारी कमाई पूर्णपणे बंद होईल, कारण त्यांना फक्त याच गेमिंग कंपन्यांकडून जाहिराती मिळत होत्या. या अहवालात मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर यांचे उदाहरण दिले आहे. त्यांच्यासाठी हे आर्थिक नुकसान एकूण जाहिरात उत्पन्नाच्या एक तृतीयांश इतके असेल. यावरून हे स्पष्ट होते की, या निर्णयाचा क्रिकेटच्या आर्थिक गणितावर खूप मोठा आणि दूरगामी परिणाम होईल. या निर्णयामुळे क्रिकेटच्या आर्थिक समीकरणांवर दूरगामी परिणाम होतील असे तज्ज्ञांचे मत आहे.