

BAN vs ZIM Test Series Sylhet Test result and highlights
ढाका : झिम्बाब्वेने बांगला देशला त्यांच्याच घरच्या मैदानावर धूळ चारत क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडवून दिली आहे. कसोटी क्रमवारीत 12 व्या क्रमांकावर असलेल्या झिम्बाब्वेने 9 व्या क्रमांकावर असलेल्या बांगला देश संघाला पराभूत करून कसोटी क्रिकेटमध्ये चमत्कार केला. झिम्बाब्वेने पहिल्या कसोटीत यजमान बांगला देशचा 3 विकेट्सने पराभव केला आणि कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
झिम्बाब्वेने पहिला कसोटी सामना 4 दिवसांत जिंकला. कर्णधार म्हणून क्रेग एर्विनचा हा पहिलाच कसोटी विजय आहे. त्याच वेळी, झिम्बाब्वेला 4 वर्षांनंतर पहिला कसोटी विजय मिळाला. झिम्बाब्वेने शेवटचा कसोटी विजय मार्च 2021 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध मिळाला होता. इतकेच नाही तर झिम्बाब्वेला 6 वर्षांनी बांगला देशमध्ये कसोटी जिंकण्यात यश आले आहे.
झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात पूर्ण केले. झिम्बाब्वेच्या विजयात सलामीवीर ब्रायन बेनेट याने मोलाचे योगदान दिले. त्याने दोन्ही डावात शानदार अर्धशतके झळकावली. त्याने पहिल्या डावात 57 तर दुसऱ्या डावात 54 धावांची महत्त्वाची खेळी साकारली.
बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यातील 2 सामन्यांची कसोटी मालिका 20 एप्रिल रोजी सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू झाली. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पहिल्या डावात त्यांचा डाव 191 धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात, ब्रायन बेनेट आणि शॉन विल्यम्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर झिम्बाब्वेने पहिल्या डावात 273 धावा करून 82 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर बांगलादेशने दुसऱ्या डावात 1 विकेट गमावून 57 धावा केल्या होत्या.
तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात पावसामुळे एकही चेंडू टाकता आला नाही. त्यानंतर कर्णधार शांतो आणि मोमिनुल हक (47) यांच्या खेळीमुळे बांगला देश संघ तिसऱ्या दिवशी पुनरागमन करू शकला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. मात्र, मोमिनुल आणि मुशफिकुर रहीम लागोपाठ बाद झाले. त्यानंतर शांतो आणि झाकीर यांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 39 धावांची भागीदारी करून पुढील कोणताही धक्का बसू नये याची खात्री केली. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझारबानीने 51 धावांत तीन विकेट्स घेतल्या.
तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस, बांगलादेशने 4 विकेट गमावल्यानंतर 194 धावा केल्या होत्या. यानंतर, चौथ्या दिवशी, यजमान संघाला त्यांच्या धावसंख्येत फक्त 61 धावा जोडता आल्या आणि त्यांचा संघ 255 धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकारे झिम्बाब्वेला जिंकण्यासाठी 174 धावांचे लक्ष्य मिळाले. दुसऱ्या डावात बांगलादेशकडून नझमुल हसन शांतोने सर्वाधिक 60 धावा केल्या. दरम्यान, जाकर अलीने 58 धावांचे योगदान दिले.
लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचे सलामीवीर ब्रायन बेनेट आणि बेन करन यांनी त्यांच्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये 95 धावांची भागीदारी झाली. बेन करन 44 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर, विकेट्सची झुंबड उडाली. ब्रायन बेनेटला मेहदी हसन मिराजने 54 धावांवर बाद केले आणि त्यानंतर झिम्बाब्वेचे सहा फलंदाज 145 धावांवर बाद झाले. यानंतर वेस्ली माधेवरे आणि वेलिंग्टन मसाकाड्झा यांनी जबाबदारी स्वीकारली आणि त्यांच्या संघाला लक्ष्याच्या जवळ आणले. वेलिंग्टन मसाकाड्झा 12 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. मसाकाड्झा बाद झाल्यानंतर, माधेवरे याने रिचर्ड नगारावासोबत जबाबदारी स्वीकारली आणि संघाला लक्ष्यापर्यंत पोहोचवल्यानंतरच सुटकेचा नि:श्वास सोडला.