

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्रा याच्यावर त्याची पत्नी गरिमा मिश्रा हिने हुंड्यासाठी छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अहवालानुसार, गरिमाने दावा केला आहे की, तिला हुंड्यासाठी सतत त्रास देण्यात आला. तिच्याकडून 10 लाख रुपये आणि एक कारची मागणी करण्यात आली. याशिवाय, तिने असा आरोपही केला आहे की अमित मिश्राचे इतर महिलांसोबत संबंध आहेत.
रिपोर्ट्सनुसार, याप्रकरणी अमित मिश्रा आणि त्याचे वडील (शशिकांत मिश्रा), आई (बीना मिश्रा), मेहुणे अमर मिश्रा, मेहुणी रितू मिश्रा आणि मेहुणी स्वाती मिश्रा यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल करण्यात आला आहे. यासोबतच गरिमा यांनी 1 कोटी रुपयांची भरपाईही मागितली आहे.
अहवालानुसार, न्यायालयाने आरोपींना नोटीस जारी केली आहे. पुढील सुनावणी 26 मे रोजी होणार आहे. गरिमा हिने एक कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. गरिमाच्या म्हणण्यानुसार, तिच्या सासरच्यांनी हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे तिची माहेरी पाठवणी थांबवली होती. अडीच लाख रुपये दिल्यानंतरच पाठवणी झाली. तिने सांगितले की सासरचे लोक त्रास द्यायचे. अमित त्याच्या कुटुंबियांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तिला शिविगाळ आणि मारहाणही करत होता.
गरिमाने असाही आरोप केला की, मॉडेलिंगमधून ती जे पैसे कमवत होती, ते अमित जबरदस्तीने हिसकावून घेत असे. तो इन्स्टाग्रामवर इतर मुलींशी चॅट करायचा आणि घटस्फोटाची धमकी द्यायचा.
दुसरीकडे, अमित मिश्रा यांचेही स्पष्टीकरण समोर आले आहे. त्याने सांगितले की, तो त्याच्या पत्नीच्या वागण्याला कंटाळला होता आणि म्हणूनच त्याने तिला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. पुढील महिन्यात 6 मे रोजी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
42 वर्षीय अमित मिश्राने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 22 कसोटी, 36 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे 76, 64 आणि 16 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, त्याने आयपीएलमध्ये 162 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 174 विकेट्स आहेत. तो आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळला आहे.