

कोलकाता : क्रिकेट समालोचक हर्षा भोगले आणि सायमन डूल यांना ईडन गार्डन्सवर समालोचनास बंदी घालावी, अशी मागणी बंगाल क्रिकेट असोसिएशनने (सीएबी) केली आहे. यासंदर्भात त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) पत्र लिहिले आहे. दोघांनी खेळपट्टीच्या मुद्द्यावरून पिच क्युरेटर सृजन मुखर्जी यांच्यावर टीका केली होती. सृजन मुखर्जी हटवादी असल्याचे त्यांनी म्हटले होते.
गेल्या काही दिवसांपासून ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवरून मोठा वाद सुरू आहे. आयपीएलच्या सुरुवातीला केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल असावी, अशी मागणी केली होती. मात्र, सृजन मुखर्जी यांनी ही मागणी फेटाळून लावली होती. खेळपट्टीत कोणताही बदल होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
याच मुद्द्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वादही झाला होता. अशातच एका सामन्यादरम्यान समालोचक हर्षा भोगले आणि सायमन डूल यांनी यासंदर्भात भाष्य करताना पिच क्युरेटर सृजन मुखर्जी यांच्यावर टीका केली होती. मुखर्जी यांनी असाच हटवादीपणा कायम ठेवला, तर कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) त्यांचे होमग्राऊंड बदलावे लागेल, असे डूल यांनी म्हटले होते.
यावर आता बंगाल क्रिकेट असोसिएशनने तीव्र नाराजी व्यक्त करत ‘बीसीसीआय’ला पत्र लिहिले आहे. समालोचकांनी अशा प्रकारे टीका करणे योग्य नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच, सृजन मुखर्जी यांनी ‘बीसीसीआय’च्या नियमांचे पालन करत खेळपट्टी तयार केली असून, कोणत्याही संघाला खेळपट्टी ठरवण्याचा अधिकार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.