

Asian Games 2026 Mixed Compound Archery Gold Medal
आयची-नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत भारताने दमदार कामगिरी करत दोन सुवर्णपदके पटकावली आहेत. महिला कंपाउंड संघापाठोपाठ भारताच्या मिश्र कंपाउंड संघानेही सुवर्णपदकावर नाव कोरले.
साहिल राजेश जाधव आणि चिकिता तनिपार्थी या जोडीने अंतिम फेरीत दक्षिण कोरियाचा शूट-ऑफमध्ये पराभव करत सुवर्णपदक जिंकले. याचबरोबर भारताने लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकमधील कंपाउंड मिश्र सांघिक प्रकारासाठी कोटा स्थानही निश्चित केले.
साहिल जाधव आणि चिकिता तनीपार्थी यांचा दक्षिण कोरियाच्या जोडीविरुद्धचा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. निर्धारित सेटनंतर दोन्ही संघांचे गुण १५७-१५७ असे बरोबरीत राहिले. त्यामुळे सुवर्णपदकाचा निर्णय शूट-ऑफद्वारे करण्यात आला.
शूट-ऑफमध्ये भारताने अचूक निशाणा साधत १०-९ असा विजय मिळवला आणि सुवर्णपदकावर नाव कोरले. या विजयामुळे भारताच्या पदकतालिकेत आठव्या सुवर्णपदकाची भर पडली.
जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताने आपले सातवे सुवर्णपदक जिंकले; महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी संघाने अंतिम फेरीत चीनचा २३८-२३४ असा पराभव करून मागील स्पर्धेतील आपले विजेतेपद कायम राखले. या विजयासह भारताच्या खात्यात आतापर्यंत एकूण ५३ पदके जमा झाली आहेत.
ज्योती, प्रतीका आणि चिखिता या त्रिकुटाने अंतिम फेरीत अचूक निशाणा साधत भारताला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. सामन्यात भारतीय खेळाडूंनी सातत्याने अचूक बाण सोडत प्रतिस्पर्धी चीनच्या संघावर आघाडी कायम ठेवली. तिन्ही खेळाडूंमध्ये उत्कृष्ट समन्वय पाहायला मिळाला. त्यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या विजयामुळे भारतीय तिरंदाजी संघाचा आत्मविश्वासही वाढला आहे.