

ashes series aus vs eng joe root first test century in australia
ब्रिस्बेन : इंग्लंडचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार जो रूट याने आज ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पिंक बॉल कसोटीच्या पहिल्याच दिवशी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आपल्या १६० व्या कसोटी सामन्यात खेळताना रूटने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर त्याचे पहिले-वहिले कसोटी शतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियातील शतकाची त्याची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे.
ब्रिस्बेनमधील 'डे-नाईट' कसोटीत गुरुवारी (दि.४) जो रूटने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा कडवा प्रतिकार करत हे ऐतिहासिक शतक पूर्ण केले. त्याने १८१ चेंडूंचा सामना करत आपले शतक पूर्ण केले. या धडाकेबाज खेळीत त्याने ११ चौकार लगावले आणि एक बाजू भक्कमपणे सांभाळून ठेवली.
ऑस्ट्रेलियातील पहिले कसोटी शतक
एकूण कसोटी शतक : ४० वे
कसोटी सामने : १६० वा सामना
रूटच्या कारकिर्दीतील हे ४० वे कसोटी शतक असले तरी, 'अॅशेस' मालिकेत आणि ऑस्ट्रेलियाच्या वेगवान खेळपट्ट्यांवर शतकी खेळी करणे हे कोणत्याही फलंदाजासाठी मोठे आव्हान असते. आज ही कामगिरी करून रूटने केवळ टीकाकारांनाच नव्हे, तर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनाही शांत केले आहे.
ब्रिस्बेनमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टॉक्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्यांचा निर्णय सुरुवातीलाच चुकीचा ठरवला. अवघ्या ५ धावांवर इंग्लंडचे पहिले दोन महत्त्वपूर्ण फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. संघ अडचणीत असताना, जो रूट फलंदाजीला उतरला. एका बाजूने इंग्लंडने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. एका टोकाकडून विकेट्स पडत असताना, दुसऱ्या टोकाला मात्र जो रूट भिंतीसारखा उभा राहिला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या धारदार गोलंदाजीचा अत्यंत संयमाने आणि कौशल्याने सामना केला आणि आपल्या कसोटी कारकिर्दीतील ४० वे शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियातील कसोटी सामन्यांमध्ये त्याचे हे पहिलेच शतक ठरले.
ज्या फलंदाजाने जगभरातील सर्व प्रमुख क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये कसोटी शतक ठोकले होते, त्याच्या ऑस्ट्रेलियातील शतकाची उणीव आज पूर्ण झाली आहे. रूटच्या या विक्रमी शतकामुळे केवळ इंग्लंडच्या डावाला स्थैर्य मिळाले नाही, तर ऑस्ट्रेलियन भूमीवर मोठी धावसंख्या उभारण्याची त्यांची आशा जिवंत ठेवली.
कसोटी क्रिकेटमध्ये जगभरात धावांचा डोंगर उभा करणाऱ्या जो रूटला ऑस्ट्रेलियात मात्र आपली छाप पाडता आली नव्हती. पर्थ येथे झालेल्या पहिल्या ॲशेस कसोटीतही त्याला खास कामगिरी करता आली नव्हती. या टीकेला रूटने बॅटने जोरदार उत्तर दिले. ब्रिस्बेन कसोटीत शतकी खेळी करत त्याने एक खास विक्रमाची नोंद केली आहे.
इयान हीली - ४१ डाव
बॉब सिम्पसन - ३६ डाव
गॉर्डन ग्रिनीज - ३२ डाव
स्टीव्ह वॉ - ३२ डाव
जो रूट - ३० डाव
जो रूटने आपले ४० वे कसोटी शतक साजरे करताना आणखी एका महत्त्वाच्या बाबतीत विक्रम मोडला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या इतिहासात सर्वाधिक शतके (२२ शतके) ठोकणाऱ्या रूटने आता परदेशातील शतकांच्या बाबतीत स्टीव्ह स्मिथलाही मागे टाकले आहे.
जो रूट : ९ शतके (पहिला क्रमांक)
स्टीव्ह स्मिथ : ८ शतके (दुसरा क्रमांक)
या शतकामुळे जो रूट आता WTC मध्ये परदेशात सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज बनला आहे.