

बर्न : भारताचा युवा बुद्धिबळपटू अर्जुन एरिगेसीने फिडेच्या जून महिन्याच्या जागतिक क्रमवारीत भारतातील अव्वल स्थान पटकावले. त्याने डी. गुकेशला मागे टाकत तिसरे स्थान मिळवले आहे.
फिडेच्या ताज्या मानांकनानुसार, एरिगेसीचे गुण 2782 तर डी. गुकेश 2776 गुणांसह पाचव्या स्थानी आहे. तथापि, नुकत्याच पार पडलेल्या नॉर्वे चेस 2025 स्पर्धेनंतर लाईव्ह क्रमवारीत एरिगेसी 2778.6 गुणांसह चौथ्या स्थानी घसरला असून, गुकेश 2776.6 गुणांसह पाचवाच राहिला आहे.
या स्पर्धेत माजी विश्वविजेता मॅग्नस कार्लसनने विक्रमी सातव्यांदा विजेतेपद पटकावले. त्याने 16 गुणांसह अव्वल स्थान पटकावले. अमेरिकेचा ग्रँडमास्टर फॅबियानो कारूआना (15.5) दुसर्या स्थानावर, तर डी. गुकेश (14.5) तिसर्या स्थानी राहिला.
हिकारू नाकामुरा (14) आणि अर्जुन एरिगायसी (13) यांनी अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान मिळवले. चीनच्या वेई यीला 9.5 गुणांसह अंतिम स्थानावर समाधान मानावे लागले.