Ajinkya Rahane Statement: 'वरिष्ठ खेळाडूंना...; अजिंक्य रहाणेच्या वक्तव्याने खळबळ, गौतम गंभीरवर अप्रत्यक्ष निशाणा?

Ajinkya Rahane Statement: भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी वरिष्ठ खेळाडूंना सन्मान, विश्वास आणि सातत्याने संधी मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
Ajinkya Rahane Statement
Ajinkya Rahane StatementPudhari
Published on
Updated on

Ajinkya Rahane Statement: भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने वरिष्ठ खेळाडूंच्या भूमिकेबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. अनुभवी खेळाडूंना संघात सन्मान आणि विश्वास मिळणे गरजेचे असल्याचे सांगताना त्याने कसोटी क्रिकेटमध्ये संयम, कणखर मानसिकता आणि कठीण परिस्थितीत खेळण्याची क्षमता अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले. त्याच्या या वक्तव्यानंतर त्याने अप्रत्यक्षपणे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे.

'स्टिक टू क्रिकेट' या पॉडकास्टमध्ये बोलताना रहाणे म्हणाला की, "गेल्या दोन वर्षांपासून मी कसोटी क्रिकेट खेळत नाही. या काळात घरी बसून मी भारतीय संघाला केवळ परदेशातच नव्हे, तर घरच्या मैदानावरही कसोटी सामने गमावताना पाहिले आहे. माझ्या मते कसोटी क्रिकेटमध्ये चांगले व्यक्तिमत्त्व आणि मानसिक ताकद असलेले खेळाडू तयार करणे अत्यंत गरजेचे आहे."

तो पुढे म्हणाला की, "संघासाठी कठीण परिस्थितीत ठामपणे उभे राहणारे खेळाडू तयार व्हायला हवेत. कसोटी क्रिकेटमध्ये एखादं कठीण सत्र संयमाने खेळून काढणं ही मोठी कला आहे. आज अनेक संघांमध्ये ही गोष्ट कमी प्रमाणात दिसते. मी कोणत्याही एका संघावर टीका करत नाही, पण खेळाडूंनी संकटाच्या काळात विकेटवर टिकून राहण्याची वृत्ती विकसित करायला हवी."

'वरिष्ठ खेळाडूंवर विश्वास ठेवणं गरजेचं'

रहाणेने स्पष्टपणे सांगितलं की, वरिष्ठ खेळाडूंना केवळ अनुभवासाठी नव्हे, तर त्यांच्या योगदानासाठी योग्य सन्मान मिळायला हवा. "अनुभवी खेळाडूंचा अनुभव संघाला कठीण परिस्थितीत मार्गदर्शन करतो. खेळाडूंना सातत्याने संधी, स्पष्ट भूमिका आणि सुरक्षिततेची भावना दिली तरच ते सर्वोत्तम कामगिरी करू शकतात," असं तो म्हणाला.

Ajinkya Rahane Statement
Ajinkya Rahane : भारताचा पराभव पाहावत नाही, 'हे' बदल करावेच लागतील; अजिंक्य रहाणेचा गौतम गंभीरला सल्‍ला

गौतम गंभीरवर अप्रत्यक्ष टीका?

रहाणेने आपल्या वक्तव्यात कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. मात्र, अलीकडच्या काळात भारतीय संघाच्या निवड प्रक्रियेवर आणि वरिष्ठ खेळाडूंबाबत घेतलेल्या निर्णयांवर सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्याचा संबंध मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी जोडला जात आहे. त्यामुळे त्याच्या या विधानाची क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Ajinkya Rahane Statement
Vaibhav Sooryavanshi: 'आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा फरक'; वैभव सूर्यवंशीबाबत अजिंक्य रहाणेचा सल्ला

ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक मालिकेची आठवण

अजिंक्य रहाणेने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्या कारकिर्दीत त्याने भारताला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले. विशेषतः 2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कर्णधारपद स्वीकारून भारताला ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. मेलबर्नमधील शतक आजही भारतीय क्रिकेटच्या सुवर्णक्षणांपैकी एक मानलं जातं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news