

Ajinkya Rahane on Vaibhav Sooryavanshi
नवी दिल्ली: भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या कसोटी भवितव्याबद्दल इतक्यात भाष्य करणे घाईचे ठरेल, असे सांगत माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने या युवा खेळाडूवर अनावश्यक दबाव न आणण्याचे आवाहन केले आहे. "आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट यामध्ये मोठा फरक असतो, त्यामुळे वैभवला त्याचा नैसर्गिक खेळ खेळू द्या आणि एक खेळाडू म्हणून त्याला घडण्याची वेळ द्या," असा मोलाचा सल्ला रहाणेने दिला आहे.
एका पॉडकास्टवर बोलताना रहाणे म्हणाला, "वैभववर आत्ताच भाष्य करून मला त्याच्यावर अतिरिक्त दडपण आणायचे नाही. तो अजून खूप लहान आहे आणि लोकांनी आधीच त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू केली आहे. त्याने आत्तापर्यंत अवघे दोन आयपीएल हंगाम खेळले आहेत. माझ्या अनुभवावरून सांगतो, आयपीएलमध्ये चार किंवा पाच षटकांत ७० धावांचा पाठलाग करणे सोपे वाटू शकते, पण देशाचे प्रतिनिधित्व करताना याच धावांचा पाठलाग करणे पूर्णपणे वेगळे असते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील दडपण अफाट असते, त्यामुळे त्याला सध्या मोकळेपणाने खेळू दिले पाहिजे."
आयपीएल २०२६ मधील चमकदार कामगिरीच्या जोरावर वैभवने भारतीय संघात स्थान मिळवले होते. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची निवड झाली होती. संजू सॅमसनच्या खराब फॉर्मनंतर त्याला इंग्लंडविरुद्ध पदार्पणाची संधी मिळाली; मात्र पहिल्या तीन टी-२० सामन्यांत (१४, १३ आणि १५ धावा) त्याला फारशी चुणूक दाखवता आली नाही.
मात्र, या अपयशातून धडा घेत वैभवने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत दमदार पुनरागमन केले. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याने अनुक्रमे अर्धशतक, २० धावा आणि अंतिम सामन्यात अवघ्या ४९ चेंडूंत ८१ धावांची धडाकेबाज खेळी केली. भारताने ही मालिका ३-० अशी खिशात घातली, तर वैभवने १५१ धावा करत मालिकावीर किताब पटकावला.