Ajinkya Rahane : भारताचा पराभव पाहावत नाही, 'हे' बदल करावेच लागतील; अजिंक्य रहाणेचा गौतम गंभीरला सल्‍ला

मागील दोन वर्षात टीम इंडियाची कसोटीतील नामुष्‍कीजनक कामगिरीकडे वेधले लक्ष
Ajinkya Rahane on Team India Test Squad
Ajinkya Rahane on Team India Test SquadPudhari
Published on
Updated on

Ajinkya Rahane on Team India Test Squad : भारतीय संघाचा माजी अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. जुलै २०२३ पासून भारतीय संघाबाहेर असलेल्या ३८ वर्षीय रहाणेने ८५ कसोटी सामन्यांत ३८.४६ च्या सरासरीने ५,०७७ धावा केल्या आहेत. निवृत्तीनंतर रहाणेने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना कसोटी संघाबाबत एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. भारतीय कसोटी संघात अनुभवी (सीनियर) खेळाडूंची संख्या जास्त असायला हवी, असे स्पष्ट मत त्याने व्यक्त केले आहे.

मागील दोन वर्षात टीम इंडियाची कसोटीत घसरण

गंभीर यांच्या कार्यकाळात भारताने मर्यादित षटकांच्या प्रकारात दोन वर्षांत दोन आयसीसी छत्रपती-चषक (ट्रॉफी) जिंकले असले, तरी कसोटीतील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. गेल्या वर्षी मायदेशात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला ऐतिहासिक व्हाईटवॉशचा सामना करावा लागला, तर इंग्लंडमधील मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. अनेक दिग्गज खेळाडूंच्या एकापाठोपाठ झालेल्या निवृत्तीमुळे कसोटी संघाच्या कामगिरीवर विपरीत परिणाम झाल्याचे रहाणेचे मानणे आहे.

Ajinkya Rahane on Team India Test Squad
Sunil Gavaskar : 'अजिंक्य रहाणेला जे मिळायला हवे होते...': सुनील गावस्‍कारांनी मांडले कटू वास्तव

'मायदेशातही पराभव पाहावे लागत आहेत'

'स्टिक टू क्रिकेट' या पॉडकास्टवर बोलताना रहाणे म्हणाला, "गेल्या दोन वर्षांपासून मी कसोटी खेळत नव्हतो आणि घरी होतो. या काळात भारतीय संघाला मायदेशातही पराभूत होताना मी पाहिले. कसोटी क्रिकेटमध्ये मजबूत मानसिकतेचे खेळाडू असायला हवेत. असे खेळाडू तयार करून आव्हानात्मक क्रिकेट खेळणे गरजेचे आहे. सध्या अनेक संघ कठीण सत्रांमध्ये (सेशन्स) टिकून खेळताना दिसत नाहीत. मला कोणत्याही संघाचे नाव घ्यायचे नाही, पण खेळाडूंनी कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना करायला हवा. कसोटी क्रिकेट हे सत्रानुसार खेळण्याचा खेळ आहे. प्रतिकूल परिस्थितीत संयम राखणे अत्यंत महत्त्वाचे असते."

सहा महिन्यांत कसोटी संघातून दिग्गजांची निवृत्ती

कसोटीतील कामगिरी खालावण्याचे मुख्य कारण म्हणजे संघात झालेला घाईगडबडीचा बदल , असे रहाणेने सांगितले. अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत रविचंद्रन अश्विन, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गजांनी कसोटीतून निवृत्ती घेतली. सध्याच्या भारतीय संघात केवळ रवींद्र जडेजा, केएल राहुल, रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांच्याकडेच ५० किंवा त्याहून अधिक कसोटी सामन्यांचा अनुभव आहे.

Ajinkya Rahane on Team India Test Squad
WWE Champion Brock Lesnar Retirement : महाकाय वादळ शांत! 'द अंडरटेकर'ला पाणी पाजणार्‍या ब्रॉक लेसनरने जाहीर केली निवृत्ती

नेहमी ७-८ अनुभवी खेळाडू आणि २-३ युवा खेळाडूंचे संयोजन हवे

"कसोटी संघात नेहमी ७-८ अनुभवी खेळाडू आणि २-३ युवा खेळाडूंचे संयोजन असायला हवे. परंतु सध्या संघात बहुतांश सर्वच खेळाडू नवखे आहेत. कसोटी क्रिकेटला अनुभवी खेळाडूंची नितांत गरज असते, असेही त्‍याने सांगितले.

'अनुभवी खेळाडूंचा सन्मान राखा'

कसोटी क्रिकेटच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करताना रहाणे म्हणाला, "मला खरोखरच कसोटीच्या भविष्याची काळजी वाटते. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या संघांनी हे क्रिकेट जिवंत ठेवणे गरजेचे आहे. भारतीय संघातून सर्वच सीनियर खेळाडू एकाच वेळी बाहेर पडल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. आपल्याला अनुभवी खेळाडूंना संघात टिकवून ठेवावे लागेल आणि त्यांचा योग्य सन्मान करावा लागेल."दरम्यान, भारतीय संघ १५ ऑगस्टपासून श्रीलंकेविरुद्ध त्यांच्याच भूमीत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) २०२५-२७ चा भाग असून भारत सध्या गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. WTC फायनलच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला श्रीलंकेचा पराभव करणे अनिवार्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news