

Abhishek Sharma NZ vs IND 3rd T20I: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी २० सामन्यात भारताने न्यूझीलंडचे १९८ धावांचे आव्हान १५ षटकांच्या आता ४ फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका खिशात घातली. भारताकडून सलामीवीर अभिषेक शर्माने दमदार फलंदाजी करत ३५ चेंडूत शतकी खेळी केली. त्याने ३८ चेंडूत ११३ धावा ठेकल्या. सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशीने देखील आपला जलवा दाखवत १९ चेंडूत ४५ धावा केल्या. त्याने अभिषेकला योग्य साथ दिली अभिषेक आणि वैभवने १३३ धावांची सलामी दिली.
अभिषेक शर्माने या धडाकेबाज खेळीत अनेक विक्रम पायदळी तुडवले. त्याने पुरूष टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले. तर आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमधील आपले चौथे शतक ठोकत अनेक दिग्गजांसोबत बरोबरी केली. अभिषेकने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला देखील मागे टाकले.
अभिषेक शर्माने पुरूष टी २० क्रिकेटमधील आपले ११ वे शतक ठोकत विराट कोहलीला मागं टाकलं. आता तो ख्रिस गेल (२२), बाबर आझम (१३) या दोघांनंतर तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. त्यानंतर चौथ्या स्थानसाठी क्विटंन डिकॉक, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर यांच्या स्पर्धा असून त्यांनी प्रत्येकी १० शतके ठोकली आहे. (Most hundreds in Men’s T20 cricket)
टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारे खेळाडू
22 - ख्रिस गेल
13 - बाबर आझम
11 - अभिषेक शर्मा
10 - क्विंटन डि कॉक
10 - विराट कोहली
10 - डेव्हिड वॉर्नर
दरम्यान, अभिषेक शर्माने पुरूष आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट स्पर्धेत देखील मोठा माईलस्टोन पार केला. त्याने आपले चौथे शतक साजरे करत वर्ल्डकप विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवशी बरोबरी केली. या यादीत ५ शतके ठोकून ग्लेन मॅक्सवेल आणि रोहित शर्मा संयुक्तरित्या अव्वल स्थानावर आहेत. तर करणबीर सिंग, फिल सॉल्ट सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी ४ शतके ठोकली आहेत. ते संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहेत.
आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट रेकॉर्ड
5 - ग्लेन मॅक्सवेल
5 - रोहित शर्मा
4 - करणबीर सिंग
4 - फिल सॉल्ट
4 - सूर्यकुमार यादव
4 - अभिषेक शर्मा
आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये फुल मेंबर संघात सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा मान अभिषेक शर्माकडे असून आजच्या सामन्यात त्याने ३५ चेंडूत अजून एक शतकी खेळी करत यादीतील आपला दबदबा अजून मोठा केला. विशेष म्हणजे याच वर्षी अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माने ३० चेंडूत शतकी खेळी केली होती. तो या यादीत अव्वल स्थानावर असून ३३ चेंडूत शतकी खेळी करणारा सिकंदर रझा हा दुसऱ्या स्थानावर आहे.