Abhishek Sharma: 96 विरुद्ध 86! अभिषेक शर्माने वैभव सूर्यवंशीला टाकलं मागे; 30 चेंडूत शतक ठोकून रचला इतिहास

Abhishek Sharma Sixes 2026: अभिषेक शर्माने 2026 मधील सर्व टी-20 सामन्यांमध्ये 96 षटकार ठोकत वैभव सूर्यवंशीला मागे टाकलं आहे.
Abhishek Sharma Sixes 2026
Abhishek Sharma Sixes 2026Pudhari
Published on
Updated on

Abhishek Sharma Sixes 2026: भारतीय क्रिकेटमधील आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांच्यात 2026 मध्ये सुरू असलेल्या षटकारांच्या शर्यतीने आता वेगळंच वळण घेतलं आहे. अभिषेक शर्माने या वर्षात सर्व टी-20 सामन्यांमध्ये तब्बल 96 षटकार ठोकले असून त्याने वैभव सूर्यवंशीला 10 षटकारांनी मागे टाकलं आहे. वैभवच्या नावावर सध्या 86 षटकार आहेत.

अफगाणिस्तानविरुद्धच्या दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात अभिषेकने केलेल्या तुफानी फलंदाजीमुळे ही आकडेवारी चर्चेत आली आहे. त्याने अवघ्या 34 चेंडूंत 108 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने तब्बल 11 षटकार आणि 9 चौकार लगावले.

अभिषेकने ठोकलं अवघ्या 30 चेंडूंत शतक

अभिषेक शर्माने या सामन्यात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपलं तिसरं शतक झळकावलं. विशेष म्हणजे त्याने अवघ्या 30 चेंडूंत शतक पूर्ण केलं. भारतीय फलंदाजाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेलं हे सर्वात वेगवान शतक ठरलं आहे.

यापूर्वी हा विक्रम 33 चेंडूंत शतक करणाऱ्या झिम्बाब्वेच्या सिकंदर रझा आणि न्यूझीलंडच्या फिन अॅलन यांच्या नावावर होता. अभिषेकने दोघांनाही मागे टाकत नवा विक्रम आपल्या नावावर केला.

भारतीय फलंदाजांमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रमही त्याने मोडला आहे. त्याने माजी कर्णधार रोहित शर्माला मागे टाकलं आहे. रोहितने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध इंदूरमध्ये 35 चेंडूंत शतक झळकावलं होतं.

2026 मध्ये सर्वाधिक षटकारांच्या शर्यतीत अभिषेक पुढे

2026 मध्ये सर्व टी-20 सामन्यांचा विचार केला तर अभिषेक शर्माने आतापर्यंत 96 षटकार ठोकले आहेत. या यादीत वैभव सूर्यवंशी 86 षटकारांसह चौथ्या स्थानावर आहे.

विशेष म्हणजे अभिषेकने यापूर्वीही षटकारांचा विक्रम केला आहे. 2025 मध्ये त्याने एका वर्षात तब्बल 108 षटकार ठोकले होते. 2024 मध्येही त्याच्या नावावर 87 षटकार होते.

मात्र षटकारांची संख्या जास्त असली तरी प्रत्येक षटकारासाठी लागणाऱ्या चेंडूंच्या बाबतीत वैभव सूर्यवंशी पुढे आहे. वैभवने सरासरी 4.99 चेंडूंमागे एक षटकार ठोकला आहे, तर अभिषेकला एका षटकारासाठी सरासरी 6.64 चेंडू लागले आहेत.

Abhishek Sharma Sixes 2026
Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण! 24 आणि 22 कॅरेटचा भाव आला खाली; 10 ग्रॅमसाठी आज किती पैसे मोजावे लागणार?

अफगाणिस्तानविरुद्ध अभिषेकची तुफानी खेळी

अफगाणिस्तानविरुद्ध भारताने प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळताच अभिषेक शर्माने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. त्याने सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर आक्रमण केलं.

अभिषेकने अवघ्या 16 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर त्याचा वेग आणखी वाढला आणि केवळ 30 चेंडूंत शतक पूर्ण केलं. अखेर तो 34 चेंडूंत 108 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत 11 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता.

एका टी-20 आंतरराष्ट्रीय डावात 11 षटकार

अफगाणिस्तानविरुद्धच्या या खेळीमुळे अभिषेक शर्माने भारतीय फलंदाजांच्या आणखी एका विशेष यादीत स्थान मिळवलं आहे.

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या एका डावात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये अभिषेक आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्याच नावावर एका डावात सर्वाधिक 13 षटकारांचा विक्रम आहे. त्याने 2025 मध्ये मुंबईत इंग्लंडविरुद्ध ही कामगिरी केली होती.

रोहित शर्माने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 10 षटकार ठोकले होते. संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि इशान किशन यांनीही टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या एका डावात 10 षटकार ठोकण्याची कामगिरी केली आहे.

Abhishek Sharma Sixes 2026
Political News: 'ईव्हीएम'मधील बिघाडाने भाजपची संख्याबळाची 'बेरीज' फिस्कटली, काँग्रेसचा चारही जागांवर विजय

भारताची पॉवरप्लेमध्ये विक्रमी सुरुवात

अभिषेक शर्माच्या आक्रमक फलंदाजीचा फायदा भारतीय संघालाही झाला. भारताने पहिल्या सहा षटकांतच 100 धावांचा टप्पा ओलांडला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताची ही पॉवरप्लेमधील आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या ठरली. या डावात संजू सॅमसननेही अभिषेकला चांगली साथ दिली. त्याने 35 चेंडूंत अर्धशतक झळकावलं.

अभिषेक शर्माच्या या तुफानी खेळीमुळे केवळ भारताच्या विजयाची चर्चा झाली नाही, तर 2026 मधील षटकारांच्या शर्यतीत अभिषेक विरुद्ध वैभव सूर्यवंशी ही स्पर्धाही पुन्हा चर्चेत आहे. अभिषेक सध्या 96 षटकारांसह आघाडीवर असून वैभव 86 षटकारांसह त्याच्या मागे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news