

भारताचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत तो अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. यासह त्याने ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला मागे टाकले आहे.
24 वर्षीय अभिषेकच्या शिरपेचात हा मानाचा तुरा अनायासे खोवला गेला आहे. सध्या त्याच्या खात्यात 829 रेटिंग रमा आहे, तर ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज हेड 814 रेटिंगसह दुसऱ्या स्थानी घसरला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या नुकत्याच पार पडलेल्या टी-20 मालिकेतून माघार घेण्याच्या निर्णयाचा हेडला मोठा फटका बसला. त्याने ऑस्ट्रेलियाकडून अखेरचा टी-20 सामना सप्टेंबर 2024 मध्ये खेळला होता.
दुसरीकडे, आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिषेकला गेल्या काही महिन्यांपासून एकही आंतरराष्ट्रीय टी-20 सामना न खेळताही या क्रमवारीचा लाभ झाला आहे. त्याने भारतासाठी अखेरचा टी-20 सामना यावर्षी फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडविरुद्ध खेळला होता. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत असून, अभिषेक या कसोटी संघाचा भाग नाही. त्याने जुलै 2024 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. भारतासाठी क्रिकेटच्या या सर्वात लहान प्रकारात त्याने आतापर्यंत 17 सामन्यांमध्ये 33.43 च्या सरासरीने 535 धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
या कामगिरीसह अभिषेकने एका विशेष क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा तो विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यानंतरचा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. हेडच्या आधी सूर्यकुमार यादव या क्रमवारीत अग्रस्थानी होता, तर विराट कोहली हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थान गाठणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे. कोहलीने 2014 ते 2017 या कालावधीत बराच काळ अव्वल स्थान स्वतःकडे राखले होते. उल्लेखनीय आहे की, कोहलीने कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे.
हेडची क्रमवारीत घसरण झाली असली तरी, वेस्ट इंडिजवर 5-0 ने मिळवलेल्या दणदणीत विजयामुळे अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंना क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे.
जोश इंग्लिस टी-20 फलंदाजांच्या यादीत सहा स्थानांची झेप घेत नवव्या स्थानी पोहोचला आहे.
टिम डेव्हिड याने 12 स्थानांची प्रगती करत 28 वे स्थान गाठले आहे.
‘मालिकावीर’ ठरलेल्या कॅमेरॉन ग्रीनने पाच सामन्यांत 205 धावा करत तब्बल 64 स्थानांची मोठी झेप घेतली असून, तो 24 व्या स्थानी पोहोचला आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत नॅथन एलिस (सात स्थानांनी प्रगती करत आठव्या स्थानी) आणि शॉन ॲबॉट (21 स्थानांनी झेप घेत 23 व्या स्थानी) यांनीही आपली क्रमवारी सुधारली आहे.
कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही प्रकारांतील फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू या तीनही श्रेणी मिळून एकूण नऊ क्रमवाऱ्यांपैकी पाच क्रमांकावर भारतीय खेळाडूंचे वर्चस्व आहे.
अभिषेक शर्मा : टी-20 मध्ये अव्वल क्रमांकाचा फलंदाज
शुभमन गिल : एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल फलंदाज
जसप्रीत बुमराह : कसोटी गोलंदाजांमध्ये अग्रस्थानी
रवींद्र जडेजा : कसोटी अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल
हार्दिक पांड्या : टी20 अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अग्रस्थानी