Virat and Gavaskar : ‘विराट, तू सचिनला फोन कर; फॉर्म परत येईल’ | पुढारी

Virat and Gavaskar : 'विराट, तू सचिनला फोन कर; फॉर्म परत येईल'

पुढारी ऑनलाईन डेस्क : ( Virat and Gavaskar) द. आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्‍याकडून सर्वांनाच ‘विराट’ खेळीच्‍या अपेक्षा होत्या. कोहलीची बॅट शतकाचा दुष्काळ संपुष्टात आणेल आणि तो मोठी इनिंग खेळेल, अशी  आशा त्‍याच्‍या फॅन्‍सला होती; पण तसे झाले नाही. पहिल्या डावात ३५ धावा आणि दुसऱ्या डावात १८ धावा अशा माफक धावसंख्येवर कोहली पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्या विकेटने चाहत्यांची निराशा झाली;पण  दूसरीकडे कर्णधार म्हणून विराटसाठी २०२१ हे वर्ष खूप चांगले गेले. दरम्यान, सुनील गावस्कर यांनी त्याला एक मोठी सूचना केली आहे आणि हेही सांगितले आहे की, नव्या वर्षात सचिन तेंडुलकरला काय विचारायचे?..२०२१ मध्‍ये भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले. अशा स्थितीत सुनील गावस्कर यांनी विराटला दिलेल्या काही सल्ल्यांबद्दल ( Virat and Gavaskar)  इथे चर्चा करूया.

२०२१ मध्ये भारताने अनेक कसोटी सामन्यांमध्ये इतिहास रचला. ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया), लॉर्ड्स (इंग्लंड), ओव्हल (इंग्लंड) आणि आता द. आफ्रिकेतील सेंच्युरियन कसोटी सामना जिंकून टीम इंडियाने मोठा पराक्रम केला. यामुळे सर्व क्रिकेट चाहते खुश आहेत. १२४ रेटिंग सह टीम इंडियाने पुन्हा एकदा कसोटीत पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, भारतीय गोलंदाज सध्या जगातील सर्वोत्तम वेगवान आक्रमणांपैकी एक असून त्यांनी भारतासाठी अनेक सामने जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली २०२० प्रमाणे २०२१ मध्येही फ्लॉप ठरला. त्याच्या बॅटमधून शतकी खेळी साकारलीच नाही. त्याच्यासह चाहत्यांनाही शतकाच्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. आता २०२२ या वर्षी तरी तो ७१ वे शतक झळकावून चाहत्यांचा आनंद द्विगुणीत करेल, याची उत्सुकता लागली आहे.

कसोटी संघाचा कर्णधार म्हणून विराटने यावर्षी अनेक इतिहास रचले. पण, एक फलंदाज म्हणून तो वर्षभर संघर्ष करतानाच दिसला. त्यातच ७१ व्या शतकाच्या प्रतीक्षेत असलेल्या चाहत्यांचे २०२१ हे संपूर्ण वर्ष असेच सरले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेली दोन वर्षे उलटून गेली आणि कर्णधाराच्या बॅटमधून एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकले नाही. ही धक्का देणारी बाब असून, विराटचा फॉर्म नेमका हरवला तरी कुठे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याच्या फटके खेळण्याच्या चूकीच्या पद्धतीवर अनेकांनी टीका केली आहे, तर अनेकांनी त्याला विविध सल्ले देखील दिले आहेत.

Virat and Gavaskar : सचिन तेंडूलकरने स्‍वत:चा कमकुवतपणा कसा शोधला…

सेंच्युरियन कसोटीबद्दल बोलायचे झाले तर विराटने पहिल्या डावात ३५ आणि दुसऱ्या डावात १८ धावा केल्या. सामना संपल्यानंतर दिग्गज माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी विराटला एक खास सल्ला दिला आहे. विराट कोहलीने सचिन तेंडूलकरला नवीन वर्षानिमित्त फोन करावा, असे त्यांनी म्हटले. यावेळी गावस्कर यांनी २००३-०४ मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचाही उल्लेख केला. त्या दौ-यादरम्यान मास्टर-ब्लास्टर सचिनने सिडनी कसोटीत द्विशतक झळकावले होते. यानंतर दुसऱ्या डावातही सचिनने अर्धशतक झळकावले. त्यामुळे टीम इंडिया हा सामना अनिर्णित ठेवण्यात यशस्वी ठरली आणि मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. गावस्कर म्हणाले, कोहलीप्रमाणेच सचिन तेंडूलकरलाही ऑफ-स्टंपच्या बाहेर जाणा-या चेंडूवर फटका मारण्याची सवय होती, ज्यावर त्याने सिडनी कसोटीत नियंत्रण मिळवले. त्यामुळे कोहलीने याबाबत सचिनकडून सल्लामसलत करने आवश्यक आहे.

कोहलीने सचिनसोबत चर्चा करावी..

विराट कोहलीच्या कमकुवतपणावर बोलताना सुनील गावस्कर यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, ‘कोहलीने सचिनला नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला पाहिजे आणि आपल्या फॉर्मवर चर्चा केली पाहिजे. सचिन ऑफ-स्टंपच्या बाहेरचे शॉट्स खेळताना बाद व्हायचा. पण २००३-०४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनी कसोटीत त्याने यावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर त्याचा खेळ बहरला. त्या कसोटी सामन्यात त्याने द्विशतक आणि अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे विराटने देखील अशा खराब शॉट्सवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. त्यासाठी त्याने सचिनशी चर्चा करावी. हेच त्याच्या गेलेल्या फॉर्मवर योग्य उत्तर आहे.’

गावस्कर पुढे म्हणाले की, ‘सचिन कव्हर्समध्ये शॉट्स खेळताना किंवा विकेटच्या मागे झेलबाद व्हायचा. त्यानंतर त्याने निर्णय घेतला की, चौथ्या टेस्टमध्ये असा आत्मघातकी फटका मारायचा नाही. त्याने केवळ मिड-ऑफ, स्ट्रेट आणि ऑन साईडलाच फटके मारले. त्यानंतरचा रिझल्ट काय आला हे सर्वांनाच माहिती आहे. त्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सचिनने नाबाद २४१ आणि दूस-या डावात नाबाद ६० धावा केल्या.’

हेही वाचलं का? 

Back to top button