Ashes 2021 : ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा धुव्वा उडवत 'हा' विक्रम ठेवला कायम! | पुढारी

Ashes 2021 : ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा धुव्वा उडवत 'हा' विक्रम ठेवला कायम!

अ‍ॅडलेड : वृत्तसंस्था

Ashes 2021 : ब्रिस्बेनपाठोपाठ ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिकेतील अ‍ॅडलेड कसोटीही आपल्या नावावर केली आहे. ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या कसोटीत इंग्लंडचा 275 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. यजमानांनी याआधी ब्रिस्बेन कसोटीत पाहुण्या इंग्लंडवर 9 गडी राखून विजय मिळवला होता. अ‍ॅडलेडमध्ये हा सामना गुलाबी चेंडूने खेळवला गेला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने डे-नाईट कसोटीत 100 टक्के विजयाचा विक्रमही कायम ठेवला आहे. पहिल्या डावात शतक आणि दुसर्‍या डावात अर्धशतक ठोकणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला विजयासाठी 467 धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने कसोटीच्या पाचव्या दिवशी चहापानापर्यंत झुंज दिली. मात्र, जे. रिचर्डसनने इंग्लंडचा निम्मा संघ माघारी धाडत इंग्लंडचा दुसरा डाव 192 धावांत गुंडाळला. ऑस्ट्रेलियाने अ‍ॅडलेड कसोटी 275 धावांनी जिंकत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.

ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 473 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पहिल्या डावात 236 धावांत गुंडाळत 237 धावांची आघाडी घेतली होती. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 230 धावांवर घोषित करीत इंग्लंड समोर 467 धावांचे आव्हान ठेवले होते. (Ashes 2021)

भले मोठे आव्हान घेऊन मैदनात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. इंग्लंड शंभरी गाठेपर्यंत ज्यो रूट, ओली पोप आणि बेन स्टोक्स माघारी गेले होते. त्यामुळे इंग्लंडची अवस्था 6 बाद 105 धावा अशी झाली होती. मात्र, त्यांनतर जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांनी झुंजार फलंदाजी करण्यास सुरुवात केली. या दोघांनी लंचपर्यंत किल्ला लढवत इंग्लंडला 150 च्या जवळ पोहोचवले. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला यश मिळू दिले नाही.

मात्र, लंचनंतर ऑस्ट्रेलियाने ही अर्धशतकी भागीदारी करणारी जोडी फोडली. जे. रिचर्डसनने 44 धावा करणार्‍या ख्रिस वोक्सला बाद करीत आपला तिसरा बळी टिपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 3 विकेटस्ची गरज होती. 39 चेंडू खेळणारा रॉबिन्सन अखेर लायनने बाद करीत इंग्लंडला आठवा धक्का दिला. वोक्स बाद झाल्यानंतर जोस बटलरने चहापानापर्यंत किल्ला लढवला. मात्र, चहापानानंतर जे. रिचर्डसनने जोस बटलरला 26 आणि जेम्स अँडरसनला 2 धावांवर बाद करीत ऑस्ट्रेलियाचा लांबलेला विजय साकार केला.

हे ही वाचा :

Back to top button