Team India Captain: ODI कर्णधारपदावरून वाद पेटला, BCCI चा विराट कोहलीवर पलटवार! | पुढारी

Team India Captain: ODI कर्णधारपदावरून वाद पेटला, BCCI चा विराट कोहलीवर पलटवार!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय वन-डे संघाच्या कर्णधारपदावरून (Team India Captain) सुरू असलेल्या ‘स्टार वॉर’च्या ज्वाळा प्रत्येक क्षणागणिक आणखी पसरताना दिसत आहेत. वन-डे कर्णधारपदावरून विराटला हटवल्यानंतर निर्माण झालेल्या वादाने आता नवे वळण घेतले आहे.

कोहलीने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट केले होते. गांगुली यांनी सांगितले होते की, बोर्डाने विराटला टी-20 कर्णधारपद (Team India Captain) सोडण्यापासून रोखले होते. तर, विराटने आरोप केला की, आपल्याला वन-डे कर्णधारपदावरून हटवण्याबाबतची सूचना दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी कसोटी संघाच्या निवडीच्या 90 मिनिटे अगोदर देण्यात आली होती. मात्र, बीसीसीआयने यावर आता पलटवार केला आहे.

बीसीसीआयच्या एका सीनिअर अधिकार्‍याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, वन-डे कर्णधारपदाबाबत विराटसोबत गेल्या सप्टेंबर महिन्यातच चर्चा करण्यात आली होती. त्याचवेळी त्याला टी-20 चे कर्णधारपद (Team India Captain) सोडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, विराटने ते मान्य केले नाही, तेव्हा त्याला मर्यादित षटकांच्या दोन प्रारूपासाठी दोन कर्णधार असू शकत नाहीत. त्यामुळे वन-डे आणि टी-20 साठी एकच कर्णधार असेल असे सांगण्यात आले होते.

यासंदर्भात काही दिवसांपूर्वी बोलताना बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांनी सांगितले होते की, ‘वन-डे कर्णधारपदावरून विराटला हटवण्याचा निर्णय बोर्ड आणि निवड समितीचा आहे. बीसीसीआयने विराटला टी-20चे कर्णधारपद न सोडण्याबाबत (Team India Captain) सांगितले होते; पण त्याने ऐकले नाही.’

विराट कोहलीला वन-डे मालिका खेळणार…

एकदिवसीय कर्णधारपद आणि रोहित शर्मा याच्यासोबत असलेल्या कथित वादाबद्दल सुरू असलेल्या अनेक चर्चांना कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने बुधवारी पत्रकार परिषदेत पूर्णविराम दिला. रोहितबरोबर कोणतेच मतभेद नाहीत. तसेच, दक्षिण आफ्रिका दौर्‍यात होणार्‍या एकदिवसीय मालिकेसाठी आपण उपलब्ध असल्याचेही त्याने सांगितले.

कर्णधार विराट कोहलीने सांगितले की, ‘दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार्‍या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत खेळण्यासाठी मी उपलब्ध होतो व यापुढेही उपलब्ध राहीन. तसेच, या मालिकेत सुट्टी घेण्यासाठी बीसीसीआयशी कधीच संपर्क साधला नव्हता, असे स्पष्ट केले.

विराट कोहली-रोहित शर्मा यांच्यात वाद सुरू असल्याची चर्चा… (Team India Captain)

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात सर्वकाही ठीक नाही, अशी अटकळ बांधण्यात येत होती. स्नायू दुखापतीमुळे रोहित शर्माने कसोटी मालिकेतून माघार घेतल्यानंतर कोहलीही आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी वन-डे मालिकेतून विश्रांती घेत असल्याच्या बातम्यांनी उलटसुलट चर्चेला आणखी ऊत आला होता.

तर आपल्याला काहीच हरकत नाही..

एकदिवसीय मालिकेतील कर्णधारपदाबाबत बोलताना विराट म्हणाला की, ‘मला कसोटी आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडायची होती; पण कसोटी संघाच्या निवडीदरम्यान निवड समितीने एकदिवसीय कर्णधारपद काढून घेत असल्याचे सांगितले. एकदिवसीय कर्णधारपद परत घेतल्याने आपल्याला काहीच हरकत नाही.’

वन-डे मालिकेसाठी उपलब्ध..

दक्षिण आफ्रिका दौर्‍यातील एकदिवसीय मालिकेबाबत बोलताना विराट म्हणाला की, ‘मी एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध आहे आणि यापूर्वीदेखील उपलब्ध होतो. मला नेहमी खेळायचे असते. मी बोर्डासोबत कधीही ब्रेकबद्दल बोललो नाही.’ टी-20 कर्णधारपदाबाबत विराटने सांगितले की, ‘टी-20चे कर्णधारपद सोडण्याबाबत मी बीसीसीआयला सांगितले होते. माझ्या या निर्णयाचा बीसीसीआयने चांगल्या पद्धतीने स्वीकार केला. बोर्डाने मला हे चांगले पाऊल असल्याचे म्हटले. मी तेव्हाच बोर्डाला एकदिवसीय आणि कसोटी संघाचे नेतृत्व करायचे असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांना जर असे वाटत नसेल तर, काहीच अडचण नसल्याचेदेखील अधिकार्‍यांना सांगितले होते.’

Back to top button