Ashes 2021 : ‘इंग्रज’ आगीतून फुफाट्यात ! मॅचही हरली आणि आता ICC चा तगडा दणका | पुढारी

Ashes 2021 : 'इंग्रज' आगीतून फुफाट्यात ! मॅचही हरली आणि आता ICC चा तगडा दणका

ब्रिसबेन; पुढारी ऑनलाईन

अॅशेस मालिकेची (Ashes 2021) सुरुवात इंग्लंड संघासाठी चांगली झाली नाही. ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाकडून संघाला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर संघाला आयसीसीने मोठा झटका दिला असून मॅच फीमध्ये कपात करण्यात आली आहे. तसेच टेस्ट चॅम्पियनशिपचे गुणही कापण्यात आले आहेत. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव २९७ धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २० धावांचे माफक लक्ष्य ठेवले. कांगारू संघाने १ गडी गमावून सामना खिशात टाकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

ब्रिसबेन कसोटी (Ashes 2021) सामन्यानंतर इंग्लंड संघाला ICC ने सामन्याच्या फीच्या १०० टक्के (100%) दंड ठोठावला आहे. एवढेच नाही तर आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपचे ५ गुणही कापले गेले आहेत. सामन्यातील स्लो ओव्हर रेटमुळे इंग्लिश संघावर हा दंड ठोठावण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या ट्रॅव्हिस हेडलाही १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. गाबावरील सामन्यात हेडने अपशब्द वापरल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये खेळणाऱ्या संघांसाठी एक अट ठेवण्यात आली आहे. या अटीनुसार कलम १६.११.२ अन्वये ते दोषी आढळल्यास त्याचे गुण वजा केले जातील. या कलमांतर्गत आज ॲशेस (Ashes 2021) मालिकेतील पहिला सामना संपन्यानंतर इंग्लंडवर कारवाई करण्यात आली आहे. इंग्लंडने निर्धारित वेळेत षटक पूर्ण न केल्यामुळे ही शिक्षा संघाला देण्यात आली असून त्यांचे ५ गुण वजा केले आहेत. तसेच मॅच रेफ्री डेव्हिड बून यांनी संपूर्ण इंग्लंड संघाच्या मॅच फीची रक्कम दंड म्हणून वजा करण्याचा निर्णय दिला. संघाला ५ षटके करायला जास्त वेळ लागला. नियमांनुसार प्रत्येक षटकामागे २० टक्के मॅच फी कापली जाते. नियमित वेळेत ५ षटके न टाकल्याबद्दल १०० टक्के फी कापण्यात आली.

ऑस्ट्रेलियन संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत एन्ट्री घेतली आहे. त्यांनी इंग्लंड विरुद्धची पहिली कसोटी ९ गडी राखून जिंकत मोठी झेप घेतली आहे. कांगारू संघ आता कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यांनी पाकिस्तान आणि टीम इंडियालाही मागे टाकले आहे. पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर तर भारत चौथ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा संघ अव्वल स्थानावर आहे.

सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा दुसरा हंगाम सुरू आहे. ४ ऑगस्टपासून या हंगामाला सुरवात झाली. २०२१ ते २०२३ या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. आयसीसीने आधीच नवीन नियम आणि पॉइंट सिस्टम जारी केले आहे. यावेळी कसोटी सामना जिंकणाऱ्या संघाला १२ गुण, सामना अनिर्णित राहिल्यास ४ गुण आणि सामना बरोबरीत सुटल्यास ६ गुण मिळतील.

त्याचवेळी, सामना जिंकल्यास १०० टक्के, टाय झाल्यास ५० टक्के, ड्रॉ झाल्यास ३३.३३ टक्के आणि हरल्यास ० गुण मिळणार आहेत. दोन सामन्यांच्या मालिकेत एकूण २४ गुण आणि पाच सामन्यांच्या मालिकेत ६० गुण मिळतील. यावेळीही प्रत्येक संघाला एकूण ६ मालिका खेळायच्या आहेत, त्यापैकी तीन परदेशी भूमीवर तर तीन मालिका घरच्या मैदानावर खेळल्या जाणार आहेत. कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या मोसमात न्यूझीलंड संघ चॅम्पियन विजयी ठरला. टीम इंडिया विरुद्धचा अंतिम सामना यावर्षी २२ जूनपासून साउथम्प्टनमध्ये खेळला गेला. या सामन्यात किवी संघाने भारतावर मात केली.

Back to top button