‘दादा’चा इगो हर्ट! BCCI कडूनच होणार विराट कोहलीचा करेक्ट कार्यक्रम, सौरभ गांगुलींचा गंभीर इशारा | पुढारी

‘दादा’चा इगो हर्ट! BCCI कडूनच होणार विराट कोहलीचा करेक्ट कार्यक्रम, सौरभ गांगुलींचा गंभीर इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने बुधवारी पत्रकार परिषद घेऊन बीसीसीआय आणि मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. त्यानंतर क्रिकेट जगतात खळबळ निर्माण झाली. आता विराट कोहली विरुद्ध बीसीसीआय हा वाद वाढणार अशी चर्चा आहे. कारण अनेक दिग्गज माजी क्रिकेटपटूंनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. आता पुढे काय होईल याकडे सर्वांची नजर लागली आहे.

दरम्यान, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने केलेल्या दाव्यामुळे नवाच वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या दाव्यानुसार, विराट कोहलीसोबत टी-२० च्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याच्या मुद्द्यावर ८ लोकांच्या उपस्थितीत चर्चा झाली होती. बैठकीत विराटला स्पष्टपणे विचारण्यात आले की, टी-20 चे कर्णधारपद सोडणे योग्य आहे का? त्या बैठकीला विराटशिवाय आठ जण उपस्थित होते. त्यात पाच निवड समितीचे सदस्य तसेच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि रोहित शर्मा यांचा समावेश होता.

भारतीय क्रिकेटमध्ये सुरू असलेल्या स्टार वॉरचे आता सत्तासंघर्षात रूपांतर होत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कसोटी कर्णधार विराट कोहलीला बोर्डाच्या ताकदीची जाणीव करून देण्यासाठी तयारी केली आहे. याचे संकेत देताना त्यांनी म्हटले आहे की, बोर्ड विराट कोहलीचे प्रकरण आपल्या पद्धतीने हाताळेल.

काल (बुधवारी, दि. १५) विराट कोहलीने पत्रकार परिषदेत दावा केला होता की, बीसीसीआयने त्याला टी-20 चे कर्णधारपद सोडण्यापासून परावृत्त केले नाही. हा दावा बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या विधानाच्या अगदी विरुद्ध होता. विराटला कर्णधारपद सोडण्यास मनाई केल्याचे गांगुली यांनी सांगितले होते.

विराटच्या या वक्तव्यामुळे गांगुली नाराज असल्याचं समजतंय. गांगुली यांनी गुरुवारी आणखी जोरदार विधान केल्याने याचे संकेतही मिळाले आहेत. विराटचे प्रकरण लोकांनी बीसीसीआयवर सोडावे, असे ते म्हणाले. मंडळ आपल्या पद्धतीने याला सामोरे जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने रोहित शर्माची वनडे आणि टी-20 संघांच्या कर्णधारपदी नियुक्ती जाहीर केली. विराटला वनडेचे कर्णधारपद सोडायचे नव्हते. यावर गांगुली म्हणाले की, बोर्डाने सप्टेंबरमध्येच त्याला सांगितले होते की, जर त्याने टी-२० कर्णधारपद सोडले तर त्याला वनडेमध्ये कायम ठेवणे कठीण होईल.

त्यामुळे तो टी-२० मध्ये कर्णधार पदी कायम राहिला. गांगुली यांच्या म्हणण्यानुसार, विराटने तसे करण्यास नकार दिला आणि त्यानंतर बीसीसीआयकडे विराटकडून एकदिवसीय कर्णधारपद घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. गांगुलीच्या मते, वनडे आणि टी 20 मध्ये दोन कर्णधार असू शकत नाहीत.

यानंतर विराटने मोठा दणका दिला आणि सांगितले की, त्याला टी-20 चे कर्णधारपद सोडण्यापासून कोणीही रोखले नाही. विराट असाही म्हणाला की, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघ जाहीर होण्याच्या अवघ्या 90 मिनिटांपूर्वी त्याला सांगण्यात आले की, तो आता एकदिवसीय संघाचा कर्णधार नाही.

गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत गांगुली यांना विराट कोहलीच्या प्रकरणी प्रश्न विचारण्यात आले. मात्र त्यांनी, ‘मी या प्रकरणावर भाष्य करणार नाही. मंडळ आपल्या पद्धतीने हे प्रकरण हाताळेल, असा इशारा दिली. कोहली आणि गांगुली यांच्यातील वादाबद्दल पत्रकार दादांना वारंवार प्रश्न विचारत होते, मात्र ते या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत होते. पत्रकारांना पटले नाही, तेव्हा गांगुलींनी हे उत्तर दिले.

गांगुलीने स्पष्ट केले, ‘कर्णधार निवडणे हे बोर्डाचे काम आहे’

बोर्ड आता विराटच्या पत्रकार परिषदेच्या मुद्द्यावर कठोरता दाखवू शकते, हे गांगुली यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले. कर्णधार निवडणे हे बोर्डाचे काम आहे. विराट कोहलीशी संबंधित प्रकरण असे नाही की बोर्ड सोडवू शकत नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर सर्व काही सुरळीत करणार असल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्याने आधीच सांगितले आहे.

Back to top button