

ब्रिसबेन; पुढारी ऑनलाईन : ब्रिसबेनमधील गाबा येथे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (ENG vs AUS) यांच्यातील ॲशेस मालिकेतील (ENG vs AUS Ashes 2021) पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. ट्रॅव्हिस हेडच्या १५२ धावांच्या खेळीच्या जोरावर संघाने पहिल्या डावात २७८ धावांची आघाडी घेतली.
ऑस्ट्रेलिया या सामन्यात चांगल्या स्थितीत आहे. मात्र, आज (दि. १०) इंग्लिश फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत सामन्यात पुनरागमन केले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडच्या संघाने ७० षटकांत २ गडी गमावून २२० धावा केल्या. जो रूट ८६ आणि डेव्हिड मलान ८० धावांवर नाबाद आहेत. इंग्लंडचा संघ अजूनही ५८ धावांनी मागे आहे.
ऑस्ट्रेलियाला २७८ धावांची आघाडी मिळानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात खेळायला उतरला तेव्हा संघाची पुन्हा खराब सुरुवात झाली. १३ धावा करून रॉरी बर्न्स पॅट कमिन्सच्या चेंडूवर अॅलेक्स कॅरीकरवी झेलबाद झाला. त्यावेळी इंग्लंडची धावसंख्या २३ होती. त्यानंतर मिचेल स्टार्कने इंग्लंडला दुसरा धक्का दिला. त्याने २७ धावांवर हसीब हमीदला बाद केले. इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट पहिल्या डावात फ्लॉप ठरला, पण दुसऱ्या डावात त्याने ८० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तर डेव्हिड मलानने १२१ चेंडूत अर्धशतक झळकावले.
गाबा कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात इंग्लंडच्या १४७ धावांच्या प्रत्युत्तरात ७ विकेट गमावून ३४३ धावा केल्या होत्या. या धावसंख्येमध्ये संघाच्या तळातील फलंदाजांणी ८२ धावांची भर घातली. त्यांचा ४२५ धावांवर ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने १५२ धावा केल्या, तर डेव्हिड वॉर्नरने ९४, मार्नस लॅबुशेनने ७४ आणि मिचेल स्टार्कने ३५ धावा केल्या. इंग्लंडकडून ऑली रॉबिन्सन आणि मार्क वुडने ३-३ बळी घेतले, तर ख्रिस वोक्सने २ बळी घेतले. जॅक लीच आणि जो रूट यांना प्रत्येकी एक बळी मिळवला.(ENG vs AUS Ashes 2021)