Team India won : न्यूझीलंडवर मात करत टीम इंडियाची नव्या विक्रमाला गवसणी! | पुढारी

Team India won : न्यूझीलंडवर मात करत टीम इंडियाची नव्या विक्रमाला गवसणी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India won : मुंबई कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने न्यूझीलंडचा दुसरा डाव १६७ धावांवर गुंडाळून हा कसोटी सामना तब्बल ३७२ धावांनी जिंकला. टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटमधला हा सर्वात मोठा विजय आहे. भारताकडून अश्विन आणि जयंतने ४-४ विकेट्स आपल्या नावावर केल्या. आज चौथ्या दिवशी जयंत यादवने आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने न्यूझीलंडच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले. ४ फलंदाजांना तंबूत पाठवून न्‍यूझीलंड संघाला हादरला दिला.  या विजयासह भारताने दोन कसोटी सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कानपूर येथे खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. तसे पाहता मुंबई कसोटी सामना अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला आहे. एकीकडे भारतीय संघाने संपूर्ण कसोटी सामन्यात जागतिक कसोटी चॅम्पियन न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवले तर दुसरीकडे फिरकीपटू एजाज पटेलने डावात १० विकेट घेत आपल्‍या नावाची नाेंद कसोटी सामन्याची सुवर्ण पानांवर  केली. हा कसोटी सामना भारताने जिंकला असला तरी पटेलने घेतलेल्या १० विकेट्समुळे हा कसोटी सामना भविष्यात लक्षात राहील यात शंका नाही.

टीम इंडियाने सलग १४ वी कसोटी मालिका जिंकली… (Team India won)

भारतीय संघाने मायदेशात सलग १४ वी कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हा एक विश्वविक्रम आहे. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन संघाने सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याची किमया केली आहे. पण ऑस्ट्रेलियाचा संघ आता भारतापेक्षा खूपच मागे पडला आहे. कांगारू संघाने मायदेशात सलग १०-१० कसोटी मालिका दोनदा जिंकल्या आहेत. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा हा विक्रम फार पूर्वीच मोडीत काढला होता. यातील बहुतांश मालिका भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली जिंकल्या आहेत.

न्यूझीलंडचा सर्वात मोठा पराभव…

धावांच्या बाबतीत न्यूझीलंडच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील हा सर्वात मोठा पराभव आहे. २००७ मध्ये न्यूझीलंडला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३५८ धावांनी पराभव पत्करावा लागला आणि आज (दि. ६, मुंबई कसोटी) भारताकडून ३७२ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला. याशिवाय २०१६ दौऱ्यावर न्यूझीलंडला इंदूरच्या मैदानावर भारताविरुद्ध ३२१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. याशिवाय २००१ मध्ये ऑकलंडमध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडवर २९९ धावांनी मात केली होती.

२०२१ मधील भारताचा सातवा विजय…

भारताने २०२१ मध्ये सातवा कसोटी सामना जिंकला आहे. न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटी जिंकण्यापूर्वी भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने जिंकले होते आणि त्याआधी झालेल्या तीन सामन्यांत भारताने इंग्लंडला मायदेशात पराभूत केले होते. याशिवाय भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एक कसोटी सामनाही जिंकला. अशा प्रकारे भारताने यावर्षी सर्वाधिक सात कसोटी सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानच्या संघाने यावर्षी ६ कसोटी सामने जिंकले आहेत. इंग्लंड संघाने या वर्षात आतापर्यंत चार कसोटी सामने जिंकले आहेत.

 

Back to top button