PBKS vs RR : राजस्थान विजयाच्या राजमार्गावर; पंजाब किंग्जला घरच्या मैदानावर हरवले | पुढारी

PBKS vs RR : राजस्थान विजयाच्या राजमार्गावर; पंजाब किंग्जला घरच्या मैदानावर हरवले

मुल्लनपूर; वृत्तसंस्था : पहिले चार सामने जिंकल्यानंतर पाचव्या सामन्यात पराभव पत्करावा लागलेल्या राजस्थान रॉयल्सचा संघ पंजाब किंग्जला हरवून पुन्हा विजयाच्या राजमार्गावर परतला आहे. शनिवारी घरच्या मैदानावर खेळणार्‍या पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे त्यांना 147 धावाच करता आल्या; पण त्यांच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करीत राजस्थानला विजयासाठी झुंजवले. हेटमायरने शेवटच्या षटकांत 10 धावा करीत विजयश्री खेचून आणली. राजस्थानने 7 विकेटस्च्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. (PBKS vs RR)

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो गोलंदाजांनी योग्य ठरवला. अथर्व तायडेने (15) दमदार सुरुवात केली; परंतु आवेश खानने त्याची विकेट मिळवली. जॉनी बेअरस्टो मैदानावर उभा होता. प्रभसिमरन सिंगला (10) युजवेंद्र चहलने माघारी पाठवून पंजाबला 41 धावांवर दुसरा धक्का दिला. केशव महाराजच्या पहिल्याच षटकात बेअरस्टो (15) झेलबाद झाला. महाराजने त्याच्या पुढच्या षटकात पंजाबचा कर्णधार सॅम कुरेनला (6) माघारी पाठवले.

कुलदीपने 13 व्या षटकात पंजाबला आणखी एक धक्का देताना शशांक सिंगला (9) स्वस्तात माघारी पाठवले. त्याच षटकात लिएम लिव्हिंगस्टोनचा झेल संजूने टाकला. जितेश शर्मा पंजाबसाठी मैदानावर उभा राहिला होता; परंतु धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो (29) झेलबाद झाला. आवेशने सामन्यातील दुसरी विकेटस् घेतली. लिव्हिंगस्टोनवर (21) सर्व भिस्त असताना दोन धावांचा मोह त्याला नडला. संजूने चतुराईने त्याला रनआऊट केले. (PBKS vs RR)

आशुतोष शर्माने अखेरच्या षटकात चांगले फटके खेचून पंजाबला 8 बाद 147 धावांपर्यंत पोहोचवले. तो शेवटच्या चेेंडूवर 31 धावांवर बाद झाला. त्यानंतर, दीडशेच्या आतील धावांचा पाठलाग करण्यासाठी राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जैस्वाल आणि तनुष कोटीयन ही ‘मुंबईकर’ जोडी मैदानात उतरली. हे दोघेही मुंबईकडून रणजी सामने खेळतात. जोस बटलर या सामन्यात खेळत नसल्याने तनुषला संधी मिळाली. जैस्वाल आक्रमक, तर तनुष सावध खेळत होता. दोघांनी अर्धशतकी सलामी दिली; पण लिव्हिंगस्टोनने तनुषला (24) बाद करून ही जोडी फोडली. यापाठोपाठ जैस्वालही (39) बाद झाला. रबाडाने त्याला बाद केले. यानंतर संजू सॅमसन (18), रियान पराग (23) आणि ध्रुव जुरेल (6) हे बाद झाल्याने राजस्थानचा संघ काहीसा दबावात आला. जुरेल बाद झाला तेव्हा राजस्थानला विजयासाठी 14 चेडूंत 30 धावा हव्या होत्या;

पण शिमरोम हेटमायरने एक चौकार आणि एक षटकार ठोकून, तर रोव्हमन पॉवेलने सलग दोन चौकार मारून दडपण कमी केले; पण 19 व्या षटकात सॅम कुरेनने पॉवेल (11) आणि केशव महाराज (1) यांना बाद करून पंजाबला सामन्यात आणले.

शेवटच्या षटकात राजस्थानला 10 धावांची आवश्यकता होती. स्ट्राईकवर हेटमायर होता. अर्शदीपने पहिले दोन चेंडू निर्धाव टाकले; पण तिसर्‍या चेंडूवर हेटमायरने षटकार ठोकला. चौथ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या आणि पाचव्या चेंडूवर पुन्हा षटकार ठोकून राजस्थानला विजयी केले.

हेही वाचा : 

Back to top button