शरद पवार, सुशीलकुमार शिंदे मोहिते-पाटलांच्या घरी; तुतारी हातात घेण्याचा मुहुर्त अखेर ठरला | पुढारी

शरद पवार, सुशीलकुमार शिंदे मोहिते-पाटलांच्या घरी; तुतारी हातात घेण्याचा मुहुर्त अखेर ठरला

अकलूज; पुढारी वृत्तसेवा : येथील शिवरत्न बंगल्यावर धैर्यशील मोहिते पाटील यांचा आज (दि.14) सायंकाळी चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होत आहे. यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी सकाळी 10 वाजता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे जेवणासाठी येत असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी माध्यमांना सांगितले. या डिनर डिप्लोमसीमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात नेमकी काय रणनीती ठरणार याविषयी उत्सुकता आहे.

सन 2004 नंतर ज्येष्ठ नेते सर्वश्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे व विजयसिंह मोहिते पाटील हे तीन ज्येष्ठ नेते प्रथमच एकत्र येत आहेत. यामुळे या भेटीकडे राजकीय जाणकारांच्या नजरा लागल्या आहेत. माढा, सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची रणनीती या निमित्ताने येथे ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शनिवारी (दि. 13) धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी माढा मतदार संघासह जिल्ह्यातील विविध पक्षाचे अनेक नेतेमंडळी व असंख्य कार्यकर्त्यांनी दिवसभरात त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. काही कार्यकर्त्यांनी त्यांना तुतारी हे निवडणूक चिन्ह भेट दिले. यावेळी त्यांच्या परिवारातील सदस्यांनीही मोहिते पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

भेटूयात शिवरत्न बंगल्यावर

धैर्यशील मोहिते-पाटील हे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर आज त्यांच्या घरासमोर मोठा फलक लावण्यात आला आहे. आज (शनिवारी) शिवरत्न बंगल्यावर सायंकाळी चार वाजता भेटूयात असा मजकूर त्यावर आहे.

Back to top button