रायबाग : विहीरीत पडलेल्या बैलांसाठी अग्निशमन दलाचे तीन तास रेस्क्यू ऑपरेशन; इटनाळ येथील घटना | पुढारी

रायबाग : विहीरीत पडलेल्या बैलांसाठी अग्निशमन दलाचे तीन तास रेस्क्यू ऑपरेशन; इटनाळ येथील घटना

निपाणी; मधुकर पाटील : एकाच मालकांच्या दोन बैलांमध्ये अचानकपणे झुंज लागली. झुंज खेळता खेळता ते 60 फूट खोल व 5 फुट पाणी असलेल्या विहिरीत पडले. रायबाग (ता. इटनाळ) शिवारातील ही घटना वेळीच मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. तब्बल तीन तासानंतर अग्निशमन दलाने अथक प्रयत्नानंतर दोन्ही बैलांना जीवदान मिळवून दिले. एका शेतकरी कुटुंबाचा आधार त्यांना परत मिळवून दिला.

याबाबतची अधिक माहिती अशी की, इटनाळ येथील शेतकरी भीमाप्पा लक्ष्मण जोगी यांनी आपल्या शेतीच्या कामासाठी दोन बैलांची पैदास केली आहे. ते आपल्या घरासमोर दोन बैलांना रात्री बांधून ते घरात झोपी गेले होते. दरम्यान शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानकपणे सदर दोन बैल अचानकपणे दुरी तोडुन वेगळे झाल्याने त्यांच्यामध्ये झुंज लागली. ही घटना वेळीच भीमापा यांच्या लक्षात आली. त्यामुळे भीमापा यांनी घाबरून आरडाओरड केली.

यावेळी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामन दलाला पाचारण केले. त्यानुसार अग्निशामन दलाचे कर्मचारी अनिल जमदाडे, सिद्धारू देवापरेडी, शंकर मुडशी, केपाणा भूतापगोळ, सुरेश हेगणनावर,संजू दळवाई यांनी तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर क्रेनच्या साह्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवून दोन्हीही बैलांना सुखरूपपणे विहिरीबाहेर काढून जीवदान मिळून दिले.

यावेळी पंचक्रोशीतील शेतकऱ्यासह नागरिकांनी अग्निशामक दलाचे अभिनंदन करून कौतुक केले. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.विशेष म्हणजे रायबाग अग्निशमन दलाने अशा प्रकारच्या अनेक घटनास्थळी जाऊन मुक्या प्राण्यांना जीवदान मिळवून दिले आहे. त्यामुळे येथील अग्निशमन दलाची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली असून हे अग्निशमन दल कौतुकास पात्र ठरले आहे.

Back to top button