

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळ्यातील पांझरा नदी लगताच्या समांतर रस्त्याजवळ धारदार शस्त्राने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली. भर दिवसा घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. घटनेनंतर पसार होण्याच्या तयारीत असणाऱ्या हल्लेखोर पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, अनिताबाई हिरामण बैसाणे (वय 40) या घरकाम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा पती हिरामण बैसाणे यांच्या समवेत वाद सुरू होता. आज त्या कामासाठी घराबाहेर पडल्या असता पांझरा नदी लगतच्या समांतर रस्त्याजवळ हिरामण बैसाणे यांनी अनिता बाई यांना थांबवून त्यांच्या मानेवर धारदार शासनाने वार केला.
त्यामुळे अनिताबाई रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. यानंतर हिरामण यांनी घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रेड्डी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पारधी, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पोलीस कर्मचारी धर्मेंद्र मोहिते, चंद्रशेखर नागरे, पुरुषोत्तम सोनवणे, दिपक गायकवाड, मनोहर पिंपळे, सुनिल राठोड, नरेश मराठे, बंटी साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या काही मिनिटांत संशयित पतीस ताब्यात घेतले. या संदर्भात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :