RR vs RCB : राजस्थान ‘सुसाट’; बेंगळुरूवर 6 विकेट राखून विजय

RR vs RCB : राजस्थान ‘सुसाट’; बेंगळुरूवर 6 विकेट राखून विजय

जयपूर; वृत्तसंस्था : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन रॉयल्समधील लढतीत राजस्थानचा विजय झाला. विराट कोहलीच्या शतकाने आरसीबीची गाडी विजयी ट्रॅकवर येईल, अशी आशा असताना शंभरावा सामना खेळणार्‍या जोस बटलरने शतक ठोकून राजस्थान रॉयल्सला विजयी केले. विराट कोहलीच्या शतकानंतरही आरसीबीला सन्मानजनक धावसंख्या उभारता आल्या नाही. त्यांनी 20 षटकांत 3 बाद 183 धावा केल्या. फाफच्या धावांचा वेग जरा जास्त राहिला असता तर ते आणखी मोठे आव्हान उभे करू शकले असते, पण ही चूक राजस्थानच्या जोस बटलर आणि संजू सॅमसन यांनी टाळली. दोघांनी वेगात धावा करून राजस्थानचा विजय सुनिश्चित केला. त्यांनी चार पैकी चार सामने जिंकले असून ते गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आले आहेत.

जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सनेदेखील आरसीबीच्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चोख प्रत्युत्तर दिले. यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद झाल्यानंतर जोस बटलर आणि संजू सॅमसन यांनी आक्रमक फलंदाजी केली. बटलरने आपला फॉर्म दाखवताना 30 चेेंडूंत अर्धशतक गाठले, तर संजूनेही 33 चेंडूत 50 धावा केल्या. दोघांनी 63 चेंंडूंत शतकी भागीदारीही पूर्ण केली. ही भागीदारी दीड शतकाच्या उंबरठ्यावर असताना मोहम्मद सिराजने संजूला बाद करून जोडी फोडली. संजूने 42 चेंडूंत 69 धावा केल्या.

राजस्थानच्या धावांचा ओघ वाहता ठेवण्याची जबाबदारी रियान पराग (4) आणि ध्रुव ज्युरेल (2) यांना पार पाडता आली नाही. परागला यश दयालने तर ज्युरेलला रिसी टोप्लेने बाद केले. यावेळी राजस्थानला 22 चेेंडूंत 20 धावा हव्या होत्या. एका बाजूने विकेट पडत असताना बटलर मात्र आरसीबीच्या गोलंदाजांची खिचडी शिजवत होता. राजस्थानच्या विजयाची औपचारिकता उरली होती; परंतु उत्सुकता होती ती बटलरच्या शतकाची. तो नव्वदीत असताना हेटमायरने चौकार ठोकला त्यामुळे टार्गेट कमी झाले. बटलर 94 धावांवर असताना राजस्थानला एका धावेची गरज होती, पण कॅमेरून ग्रीनच्या चेंडूवर बटलरने षटकार ठोकून शतक गाठले आणि विजयही साजरा केला. 58 चेंडूंत त्याचे हे शतक पूर्ण झाले. यात 9 चौकार आणि 4 षटकांराचा समावेश होता.

तत्पूर्वी, विराट व फाफ डू प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी 125 धावा जोडल्या. विराटने फाफसह 12 षटकांत शतकी धावा उभ्या केल्या. विराट व फाफ यांची 2022 नंतरची ही सहावी शतकी भागीदारी ठरली. 14व्या षटकात यजुवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर विराटचा पॉईंटवर नांद्रे बर्गरने झेल टाकला. त्याच षटकात फाफचा सोपा झेल ट्रेंट बोल्टने टाकला. मात्र, पुढच्या चेंडूवर जोस बटलरने झेल घेऊन 125 धावांची ही भागीदारी तोडली. फाफ 33 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकारांसह 44 धावांवर बाद झाला. ग्लेन मॅक्सवेल (1) पुन्हा फेल गेला आणि नांद्रे बर्गरने त्याचा त्रिफळा उडवला. चहलने सामन्यातील दुसरी विकेट घेताना पदार्पणवीर सौरव चौहानला (9) बाद केले. पण, विराटने पुढच्या चेंडूवर चहलचे षटकाराने स्वागत केले. विराटने 67 चेंडूंत 9 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने आयपीएलमधील आठवे शतक झळकावले. टी-20 तील एकंदर त्याचे हे नववे शतक आहे. विराटच्या शतकानंतरही आरसीबीला 20 षटकांत 3 बाद 183 धावाच करता आल्या. विराट 72 चेंडूंत 12 चौकार व 4 षटकारांसह 113 धावावर नाबाद राहिला.

 हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news