

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अशोक चव्हाणांमुळे काँग्रेसची सांगली आणि भिवंडीची जागा गेली, अशा बातम्या माध्यमांमध्ये फिरत आहेत. या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असून काँग्रेस नेते आपले अपयश झाकण्यासाठी आणि पक्षश्रेष्ठींना काही सांगण्यासारखे नसल्यामुळे असे काहीतरी बोलत आहेत, असे जोरदार प्रत्युत्तर भाजप नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस नेत्यांना दिले. Ashok Chavan on Congress
अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करून जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला. मात्र, अलीकडच्या काळात अशोक चव्हाण यांच्यामुळे काँग्रेसने काही जागा गमावल्या किंवा महाविकास आघाडीत इतर पक्षांना द्याव्या लागल्या, असा आरोप काँग्रेस नेते दबक्या आवाजात करत होते. गेले काही दिवस त्या संदर्भातल्या बातम्याही येत आहेत. यावर अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण देत काँग्रेस नेत्यांना खडे बोल सुनावले. राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. Ashok Chavan on Congress
अशोक चव्हाण म्हणाले की, मी काँग्रेसमध्ये असताना कुठलेही निर्णय घेताना माझ्या भूमिकेला मर्यादा होत्या. मुख्य भूमिका प्रदेशांध्यक्षांची राहत असते. मी पक्ष सोडून आता जवळपास दीड महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्या दरम्यानही अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. त्यामुळे आता अशा पद्धतीने बोलणे म्हणजे एकतर आपले अपयश लपवण्यासाठी बोलणे किंवा पक्षश्रेष्ठींना याबद्दल काय सांगावे, हा प्रश्न पडला असेल, म्हणून काँग्रेस नेते निष्कारण असे बोलत असतील, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
याच दरम्यान, भाजप प्रवेशाबाबत बोलताना ते म्हणाले की, मी भाजपमध्ये प्रवेश केला हा पूर्णपणे माझा निर्णय होता. माझ्यासोबत यावे असे मी कुणालाही बोललो नव्हतो. परंतु लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप नक्कीच यश मिळवणार आहे आणि सरकार स्थापन करणार आहे. मोदींची गॅरंटी ही देशातील सर्वात मोठी गॅरंटी आहे आणि काहीही झाले तरी त्यावरच लोकांचा विश्वास आहे, असेही ते म्हणाले. अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर पहिली निवडणूक लोकसभेची होत आहे, यावर बोलताना ते म्हणाले की मी कुठल्याही परीक्षेत उतरतो तर तयारीनेच उतरतो, अशी मिश्कील टीपण्णीही त्यांनी केली. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर होत असलेल्या चर्चेंबाबत मला काहीही माहिती नाही. परंतु ते पक्षात आल्यास त्यांचे स्वागतच आहे, असेही चव्हाण म्हणाले.
अशोक चव्हाण यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. त्यानंतर ते संसदेबाहेर पडले आणि माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अनेक नेते, आमदार त्यांच्यासोबत भाजपमध्ये येणार आहेत. याबद्दल विचारले असता अशोक चव्हाण गाडीत बसताना म्हणाले की, "मी स्वतः कुणाशीही बोललो नाही. लोकसभा निवडणुकीनंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील." नेमके गाडीत बसल्यानंतर अशोक चव्हाण म्हणाले की, "आगे आगे देखो होता है क्या" त्यामुळे लोकसभेनंतर आणखी काही नेत्यांचे भाजप प्रवेश होऊ शकतात, असे सूचक वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले आहे.
हेही वाचा