तुम्ही कितीही धमक्या द्या, तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही : शरद पवार

तुम्ही कितीही धमक्या द्या, तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही : शरद पवार

बारामती : पुढारी वृत्तसेवा : शनिवारी (दि. ६) रात्री माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा बारामतीत पार पाडला. यावेळी शरद पवार बोलत होते.  तुम्ही कितीही धमक्या द्या, तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी ही अवलाद आहे. हा महाराष्ट्र पुन्हा ऐक्याने चालवू शकतो हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा खासदार शरद पवार यांनी दिला.

या मेळाव्यास शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार सचिन आहेर, खासदार सुप्रिया सुळे, यांच्यासह शिवसेनेचे इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी व खडकवासला या तालुक्यातील महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका ठिकाणी भाषण केले, मी दोन पक्ष फोडून सत्तेवर आलो म्हणाले. आता यांचं काय कर्तृत्व? त्यांनी काय काम केलं? पक्ष फोडण्याचं काम केलं! कुणाचं घर फोडण्याचे काम केलं! खऱ्या अर्थाने महाराष्ट्र फोडण्याचे काम केलं.

त्यांना हे माहित नाही, त्यांनी पक्ष फोडला असेल, काही लोक गेले असतील, पण त्यांना हे माहीत नाही की, काही लोक गेले असतील, फोडले असतील, परंतु हजारो नाही तर लाखोंच्या संख्येने शिवसैनिक आहेत, ते मात्र जागेवरच आहेत. ते त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा ऐक्याने महाराष्ट्र चालवू शकतो हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत.

आज सत्तेचा गैरवापर केला जात आहे. राज्याच्या प्रमुखांनी दहशत निर्माण केली आहे. निवडणुका महाराष्ट्रामध्ये आल्या आहेत, पण आता आता कोणी फोन करतो. कोणी धमक्या देतो सध्या हे महाराष्ट्रात सुरू आहे, पण त्यांना हे माहीत नाही, तुम्ही कितीही दम दिला व धमक्या दिल्या, तरीही त्याला भीक न घालणारी ही अवलाद आहे. ती अवलाद कुणाही समोर झुकणार नाही असे पवार म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news