पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमध्ये (IPL 2024) रविवारी २४ मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि गुजरात (GT vs MI) टायटन्स यांच्यात चुरशीचा सामना झाला. अतिशय रोमांचक झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने सहा धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यात विजय किंवा पराभवापेक्षा दोन खेळाडूंचीच अधिक चर्चा झाली ती म्हणजे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya). संपूर्ण सामन्यात प्रेक्षकांनी हार्दिक पंड्याचा हुर्यो उडवत रोहितच्या नावाचा जयघोष केला. हार्दिकच्या विरोधात चाहत्यांनी केलेला गोंधळ पाहून कॉमेंट्री करणाऱ्या केविन पीटरसननेही आश्चर्य व्यक्त केले. (IPL 2024 GT vs MI)
संबंधित बातम्या :
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (GT vs MI) यांच्यात रविवारी सामना रंगला होता. सीझन सुरू होण्याच्या काही दिवस आधी मुंबईने रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर चाहत्यांनी मोठा आक्षेप घेतला होता. आता गुजरात विरुद्ध मुंबई सामन्यातही पंड्या याच प्रकरणामुळे पुन्हा प्रेक्षकांच्या निशाण्यावर राहिला. गुजरात विरुद्धच्या सामन्यात पंड्याविरुद्ध प्रेक्षकांनी खूप गोंधळ घातला.
कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) जेव्हा नाणेफेकीसाठी मैदानात उतरला तेव्हा प्रेक्षकांनी त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी चाहते 'रोहित-रोहित'च्या घोषणाही देत होते. संपूर्ण सामन्यात हार्दिकच्या विरोधात जोरदार चर्चा सुरू होती. याबाबत पीटरसन म्हणाले, "मला माहित नाही की भारतातच एखाद्या भारतीय क्रिकेटपटूला अस कधी ट्रोल केलं आहे. अहमदाबादमध्ये हार्दिक पंड्याला प्रेक्षकांकडून जेवढी वाईट वागणूक मिळत आहे, तशी वागणूक मी कोणत्याही भारतीय खेळाडूसोबत पाहिली नाही. ही दुर्मिळ घटना आहे. ते पुढे म्हणाले, "हार्दिक पंड्या मुंबईचा कर्णधार आहे. पण क्षेत्ररक्षणासाठी धावताना अथवा गोलंदाजी करताना प्रेक्षकांनी पंड्याची हुर्यो उडवून नाराजी व्यक्त केली. भारतातील कोणत्याही खेळाडूसोबत असे घडताना मी पाहिले नाही."
१५ डिसेंबर रोजी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) कर्णधार म्हणून नियुक्त करण्याची घोषणा केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. २०१३ मध्ये तो मुंबईचा कर्णधार बनला. त्यानंतर दहा हंगामात त्याने संघाचे नेतृत्व केले. हेच चाहत्यांच्या संतापाचे खरे कारण आहे.
हेही वाचा :