IND vs ENG 5th Test | पाचव्या कसोटीत डबल धमाका; रोहित-शुभमनची शतके | पुढारी

IND vs ENG 5th Test | पाचव्या कसोटीत डबल धमाका; रोहित-शुभमनची शतके

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यात भारतीय फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतक ठोकत डबल धमाका दिला. मालिकेतील शेवटच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना सर्वबाद 218 धावा केल्या. गोलंदाजीमध्ये सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताच्या फिरकीपटूंनी कमाल दाखवत इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. यामध्ये कुलदीपने सर्वाधिक 5, अश्विनने 4 तर जडेजाने 1 विकेट घेतली. इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वी 57 धावा करून बाद झाला. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या शुभमनने रोहितसोबत दुसऱ्या विकेटसाठी 160 धावांची भागिदारी रचत आपली शतके झळकावून दुसरा दिवस गाजवला. (IND vs ENG 5th Test)

रोहित-शुभमन यांचे धमाकेदार शतक

इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने कसोटी कारकिर्दीतील 12वे शतक झळकावले. याच्या पुढच्याच बॉलवर शुभमन गिलनेही आपले शतक झळकावले. त्याचे हे कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक आहे. त्याच्या शतकाच्या वेळी त्याचे वडिलांनी उभे राहून त्याचे अभिनंदन केले. रोहितने 154 बॉलमध्ये तर शुभमनने 136 बॉलमध्ये शतक झळकावले

या मालिकेत शुभमनचे तीन वेळा शतक हुकले. मात्र, आज त्याने आपले शतक पूर्ण केले. त्याचबरोबर या मालिकेत रोहितने आणखी एक शतक झळकावले आहे. राजकोट कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 131 धावा केल्या होत्या. भारताने एका विकेटवर 262 धावा केल्या आहेत. सध्या शुभमन 100 धावा करून क्रीजवर आहे आणि रोहित 101 धावा केल्यानंतर. दोघांमध्ये 158 धावांची भागीदारी झाली आहे.

इंग्लंडचा पहिला डाव

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली. बेन डकेट आणि जॅक क्रोली यांनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. कुलदीपने ही भागीदारी फोडली. त्याने डकेटला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. डकेटने आपल्या खेळीत 27 धावा केल्या. यानंतर क्रॉलीने कसोटी कारकिर्दीतील 14वे अर्धशतक आणि भारताविरुद्ध पाचवे अर्धशतक पूर्ण केले. उपाहारापूर्वी कुलदीपने ऑली पोपला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकडून यष्टिचित करून इंग्लिश संघाला आणखी एक धक्का दिला. पोप 11 धावा करू शकला. (IND vs ENG 5th Test)

पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी 25.3 षटके टाकली. यामध्ये इंग्लंडने 2 विकेट गमावून 100 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या सत्रात इंग्लंडने 29.3 षटकात 6 गडी गमावून 94 धावा केल्या. एके काळी इंग्लंडची धावसंख्या ३८व्या षटकात दोन गडी बाद १३७ धावा अशी होती. क्रॉलीची विकेट पडल्यानंतर इंग्लंडचा डाव गडगडला. 137 धावांवर दोन बाद अशी धावसंख्या असलेला संघ 58 व्या षटकात 218 धावांवर गारद झाला.

क्रॉलीने 108 चेंडूंत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 79 धावा केल्या. जो रूट 26 धावा करून बाद झाला, तर 100वी कसोटी खेळणारा जॉनी बेअरस्टो 29 धावा करून बाद झाला. कुलदीपने कर्णधार बेन स्टोक्सला खातेही उघडू दिले नाही. इंग्लंडची धावसंख्या 175 धावांवर असताना संघाने बेअरस्टो, रूट आणि स्टोक्सच्या विकेट्स गमावल्या. अश्विनने डावाच्या 50 व्या षटकात हार्टली (6) आणि वूड (0) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर अँडरसनला (0) पॅव्हेलियनमध्ये पाठवून इंग्लंडचा डाव 218 धावांवर आटोपला. बशीर 11 धावा करून नाबाद राहिला. गोलंदाजीमध्ये भारताकडून कुलदीप यादवने पाच विकेट घेतल्या. त्याच वेळी, रविचंद्रन अश्विनने 100 वी कसोटी सामन्यात चार विकेट घेतल्या. याशिवाय रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली. म्हणजे इंग्लंडच्या सर्व 10 विकेट फिरकीपटूंनी घेतल्या.

हेही वाचा :

Back to top button