Loksabha Election : भाजपचे सर्व्हे ठरवणार शिरूरचा राष्ट्रवादीचा उमेदवार.. | पुढारी

Loksabha Election : भाजपचे सर्व्हे ठरवणार शिरूरचा राष्ट्रवादीचा उमेदवार..

सुषमा नेहरकर-शिंदे

 शिवनेरी : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने गेले दोन- अडीच वर्षांपासून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघासह राज्यातील प्रत्येक मतदारसंघात तीन-चार वेळा निवडणूक सर्व्हे करून कोणत्या पक्षाच्या कोणत्या उमेदवाराला लोकांची सर्वाधिक पसंती आहे, निवडून येण्याची शक्यता कुणाची आहे, कोण किती मतदारसंघात सक्रिय आहे याची खडान खडा माहिती भाजपकडे आकडेवारीसह उपलब्ध आहे. यामुळेच शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील उमेदवार ठरवताना या सर्व्हेचा आधार घेतला जाणार का, याकडे लक्ष लागले आहे.

राज्यातील महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात गेले दोन दिवसांपासून भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांच्यासोबत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची खलबते सुरू आहेत. यामध्ये निवडून येणारा उमेदवार हा एकमेव निकष महत्त्वाचा ठरला असल्याची चर्चा असून, तो उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी त्यालाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू आहेत. आतापर्यंत एक-एका जागेवरून अडवून बसणारे पक्ष या वेळी भाजपच्या या निवडणूक सर्व्हेमुळे चिडीचूप आहेत. त्यामुळेच आता शिरूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार निश्चित होताना भाजपच्या निवडणूक सर्व्हेचा मोठा आधार ठरू शकतो.

शिरूरची जागा महायुतीमध्ये मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार असली तरी या मतदारसंघात भाजपची जय्यत तयारी सुरू आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर (बुथ) कार्यकर्ते नियुक्त करण्यात आले आहेत. या बुथ कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे, गावागावातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचण्याची सर्व यंत्रणादेखील सज्ज आहे. यामुळे उमेदवार जरी राष्ट्रवादी काँग्रेसचा असला तरी अबकी बार 400 पार यासाठी भाजपचीही यंत्रणा महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी मोठी दिलासादायक ठरू शकते. उमेदवार निश्चित नसला तरी तयारी मात्र पूर्ण झाली आहे, हीच खरी वस्तुस्थिती आहे.

हेही वाचा

Back to top button