International Womens Day : पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ‘तिची’ लढाई | पुढारी

International Womens Day : पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ‘तिची’ लढाई

नाशिक : आनंद बोरा

महाराष्ट्रातील पक्षितीर्थ म्हणून परिचित असलेले आणि महाराष्टातील पहिले रामसर दर्जा मिळालेले नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य जसे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे तसे ते तेथील वनरक्षक आशा वानखेडे यांच्या बहादुरीसाठी देखील प्रसिद्ध म्हणावे लागेल. नांदूरमधील या दबंग वनरक्षकाने स्वतःच्या हिमतीवर वाळू माफियांसमोर जावून वाळू चोरी पकडली आहे. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या आशा वानखेडे सकाळी सात वाजताच पक्षी अभयारण्यात हजर होतात. राहण्यासाठी नाशिकमध्ये असताना रोज आपल्या दुचाकी वाहनाने प्रवास करीत त्या सकाळी अभयारण्यात उपस्थित असतात.

आशा वानखेडे यांचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील यावल असून या परिसरात दाट जंगल असल्याने त्यांना वन्यप्राणी नेहमी दिसत असे. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी शिक्षणासाठी नाशिकची निवड केली. पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर २०११ मध्ये त्या वन विभागात वनरक्षक म्हणून काम करू लागल्या. पेठ, हरसूलमध्ये त्यांनी काम केले आहे. बिबट्या संवर्धनासाठी त्यांनी अनेक पाड्यावर जनजागृती कार्यक्रम घेतले आहे. आदिवासी भागामध्ये गुजरात हद्दीजवळ सागाची मोठी तस्करी चालत असे. आशाताईंनी रात्रंदिवस काम करून तस्करी बंद केली. नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात सध्या त्या काम करीत असून वाळू तस्करांशी अनेक वेळा त्यांनी सामना केला आहे. अनेक जखमी पक्ष्यांना त्यांनी जीवदान दिले आहे. पक्षी संवर्धन कामे करीत असतांना अनेक वेळा त्या जीव धोक्यात घालून देखील काम करतात. मासेमारी करणाऱ्यांना त्या प्रबोधन करून पक्षी का हवे हे समजावून सांगतात. तेथे येणाऱ्या पर्यटकांना पक्ष्यांची माहिती देवून नियम पाळण्यासाठी आग्रही देखील असतात. एक महिला म्हणून आपली वेगळी ओळख या परिसरात त्यांनी निर्माण केली आहे. वन विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, गाईड यांचे सहकार्य त्यांना मिळते. भविष्यात आरएफओ बनण्याचे स्वप्न त्या बघतात.

वनरक्षक पदावर काम करतांना अनेक जबादाऱ्या असतात. एक महिला म्हणून काम करतांना कुठे ही दबाव येत नाही. प्रामाणिक काम केल्यास त्याचे फळ मिळतेच. पेठमध्ये असताना सागाची तस्लाकरी थांबविली होती. आरएफओ व बनण्याची इच्छा असून त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.- आशा वानखेडे, वन रक्षक.

Back to top button