नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
मध्य रेल्वेने सर्व क्षेत्रिय रेल्वेंमध्ये प्रवासीसंख्या आणि भाडे व्यतिरिक्त महसूलामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. मुंबई, नाशिक, जळगाव आदी जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मध्य रेल्वेने कार्यक्षम व्यवस्थापनामुळे उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
मध्य रेल्वेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात (एप्रिल-२०२३ ते फेब्रुवारी-२०२४) उल्लेखनीय कामगिरी करत १४४९.५३ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली, जी गतवर्षीच्या याच कालावधीतील १३३३.५७ दशलक्षच्या तुलनेत ८.७० टक्क्यांनी वाढली आहे. प्रवासी वाहतुकीतून मध्य रेल्वेला ६७००.८० कोटी रुपये मिळाले. जे मागील वर्षी याच कालावधीतील ५८५५.८१ कोटीच्या तुलनेत १४.४३ टक्के अधिक आहेत. भाडे व्यतिरिक्त महसुलात मध्य रेल्वेने विविध मार्गाने ११०.९९ कोटी उत्पन्न मिळविले. गतवर्षी याच कालावधीत ७८.८६ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. यंदा त्यात ४०.७४ टक्क्यांनी वाढ झाली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर आणि पनवेल स्थानकांवर ५८.९९ लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या आणि बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांच्या करारासह फेब्रुवारी-२०२४ मध्ये ९.८३ कोटी रुपयांच्या वार्षिक परवाना शुल्कासह ई-लिलावाव्दारे पाच वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आलेल्या १२ निविदांचा समावेश यात आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस येथे बीओटी या तत्त्वावर वातानुकूलित शयनगृह आणि विश्रांतीगृह तसेच व्यवस्थापन यासाठी पाच वर्षांसाठी असलेल्या वार्षिक ६३.६३ लाख रुपयांच्या कराराचाही समावेश आहे. मध्य रेल्वे नवीन संधी आणि नाविन्यपूर्ण जाहिरात वाढीची रणनीति शोधली आहे, ज्यामुळे भाडे व्यतिरिक्त महसुलात आणखी वाढ होईल. यातून प्रवासी सेवा आणि रेल्वे पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.