#INDvNZ : आजपासून पहिली टेस्ट, सहा प्रमुख खेळाडूंविना टीम इंडिया खेळणार | पुढारी

#INDvNZ : आजपासून पहिली टेस्ट, सहा प्रमुख खेळाडूंविना टीम इंडिया खेळणार

कानपूर : वृत्तसंस्था

#INDvNZ : नियमित कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मासह सहा प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघ उद्यापासून (गुरुवार) सुरू होणार्‍या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

भारताचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे. मात्र, बर्‍याच काळापासून त्याचा फॉर्म चांगला नाही. यासोबतच दुखापतग्रस्त के. एल. राहुल व वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हेसुद्धा या कसोटीत खेळणार नाहीत; पण ऑस्ट्रेलियात अशाच बिकट परिस्थितीत भारताने विजय मिळवला होता.

याच कामगिरीतून प्रेरणा घेत भारताला न्यूझीलंडविरुद्ध चांगली कामगिरी करावी लागेल. मुंबईचे दोन फलंदाज सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यापैकी एकाला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळेल. रोहित, राहुल आणि ऋषभ पंत यांच्या अनुपस्थितीत प्रशिक्षक राहुल द्रविडला दक्षिण आफ्रिका दौर्‍यापूर्वी अन्य खेळाडूंच्या क्षमता पाहण्याची संधी मिळेल.

फलंदाजीत रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि मयंक अग्रवाल यांनीच 10 हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. अग्रवालने चांगली कामगिरी केल्यास राहुलचे पुनरागमन कठीण होऊ शकते. शुभमन गिलच्या कामगिरीकडेदेखील संघाच्या नजरा असणार आहेत. या सामन्यात सर्व नजरा रहाणेवर असतील.

गेल्या 11 कसोटी सामन्यांत 19 च्या सरासरीने त्याने धावा केल्या आहेत. या दोन सामन्यांत त्याने चांगली कामगिरी न केल्यास त्याला दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यातील संघात स्थान मिळवणेदेखील कठीण होऊ शकते. सरावादरम्यानही रहाणे आत्मविश्वासाने खेळताना दिसला नाही. यातच त्याला कर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.

संघात सीनिअर गोलंदाज इशांत शर्माची स्थितीदेखील फारशी चांगली नाही. नेट सरावादरम्यान देखील तो फॉर्मात दिसला नाही. इशांत शर्माला अंतिम एकादशमध्ये संधी मिळाल्यास त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. उमेश यादवची अंतिम एकादशमधील जागा जवळपास निश्चित आहे.

सूर्यकुमार व श्रेयस यापैकी जो कोणी पदार्पण करेल त्याची निवड भविष्याच्या द़ृष्टीने केली जाईल. कारण, पुजारा व रहाणे हे आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या टप्प्यात आहेत. गिल व मयंक डावाची सुरुवात करतील व त्यानंतर पुजारा व रहाणे फलंदाजीस उतरणे शक्य आहे.

आर. अश्विनकडून नेहमीप्रमाणे चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्याचा सामना केन विल्यम्सनशी होणार आहे. रॉस टेलर, टॉम लॅथम आणि हेन्री निकोल्स हे अश्विन व रवींद्र जडेजाचा सामना करण्याच्या द़ृष्टीने तयारीनिशी आले असतील.

अक्षर पटेल तिसरा फिरकीपटू असण्याची शक्यता आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध पदार्पण करत 27 विकेटस् मिळवल्या होत्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदी आणि नील वॅगनर नवीन चेंडूने गोलंदाजी करतील. यासोबतच अय्याज पटेल व मिचेल सँटेनर यांच्याकडे देखील नजरा असतील.

कानपूरमध्ये भारत

एकूण टेस्ट 22
विजयी 07
पराभूत 03
अनिर्णीत 12

हेड टू हेड

एकूण टेस्ट 60
भारत विजयी 21
न्यूझीलंड विजयी 13
अनिर्णीत 26

4 ग्रीन पार्कवर भारताला विजयाचा चौकार मारण्याची संधी आहे. येथे यापूर्वीच्या सलग तीन सामन्यांत टीम इंडियाने विजय मिळविला आहे. 2008 मध्ये दक्षिण आफ्रिका, 2009 मध्ये श्रीलंका आणि 2019 मध्ये न्यूझीलंडवर विजय मिळविला आहे.

1983 ग्रीन पार्कवर भारताला शेवटचा पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळविला होता. त्यानंतर टीम इंडियाने 8 कसोटी खेळताना येथे 5 मध्ये विजय तर 3 सामने अनिर्णीत राखले आहेत.

#INDvNZ संघ यातून निवडणार

भारत : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, जयंत यादव, श्रीकर भरत, प्रसिद्ध कृष्णा.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम लॅथम, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल (यष्टिरक्षक), विल यंग, ग्लेन फिलिप्स, डेरिल मिचेल, टीम साऊदी, नील वॅगनर, काईल जेमीन्सन, विल्यम सोमरविले, अय्याज पटेल, मिचेल सँटेनर, रचिन रवींद्र.

कानपूरमध्ये भारत वि. न्यूझीलंड

1976 : कसोटी अनिर्णीत
1999 : भारत 8 विकेटस्ने विजयी
2016 : भारत 197 धावांनी विजयी

पहिली कसोटी

स्थळ : ग्रीन पार्क, कानपूर
वेळ : सकाळी 9.30 पासून
थेट प्रसारण : स्टार स्पोर्टस्

हेही वाचलं का?

Back to top button