सातारा : सहा नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला धूमशान | पुढारी

सातारा : सहा नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला धूमशान

सातारा; पुढारी वृत्तसेवा

राज्यात मुदत संपणार्‍या 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा बुधवारी करण्यात आली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा आणि दहिवडी नगरपंचायतींचेही धूमशान होणार आहे. या सर्व नगरपंचायतींसाठी दि. 21 डिसेंबर रोजी मतदान तर 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. जिल्हा बँकेपाठोपाठ नगरपंचयातींचे धूमशान सुरू होणार असल्याने जिल्ह्याचा राजकीय आखाडा होणार आहे.

राज्यातील 105 व जिल्ह्यातील सर्व 6 नगरपंचायतींची मुदत डिसेंबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे राज्य निवडणुक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी बुधवारी निवडणुकांची घोषणा केली. त्यामुळे बुधवारपासूनच अचारसंहिता लागू झाली आहे. एकीकडे सहकारातील मातृसंस्था असणार्‍या जिल्हा बँकेचा धुरळा शांत बसल्यानंतर आता नगरपंचायतींचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे खंडाळा, कोरेगाव, पाटण, माण व खटाव तालुक्यात नेते एकमेकांना भिडणार आहेत. जाहीर झालेल्या लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा आणि दहिवडी नगरपंचायतींसाठी प्रारूप प्रभाग रचना यापूर्वीच झाली आहे. सुरुवातीला आरक्षण सोडत घेण्यात आली होती. मात्र, यामध्ये तांत्रिक अडचण आल्याने पुन्हा फेर आरक्षण सोडत घेण्यात आली होती. त्यानंतर प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडूनही जोरदार हालचाली सुरू आहेत.

बुधवारी निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष आता सक्रीय झाले आहेत. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर निवडणुकींसाठी रणनीती आखली जाणार आहे. दरम्यान, राखीव जागेवर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर कोविड संदर्भात केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार व आवश्यक त्या उपाययोजना करून या निवडणुकांचा कार्यक्रम राबवावा. त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2020 रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, असेही निर्देश संबंधित जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

हेही वाचलत का?

Back to top button