कोलकाता ; वृत्तसंस्था : यजमान भारत आणि पाहुण्या न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर उद्या (रविवार) रंगणार आहे. पहिला व दुसरा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतलेली रोहित सेना तिसरी लढतही जिंकून न्यूझीलंडला 'क्लीन स्वीप' करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.
नवा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने जयपूर आणि रांची येथे विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रोहितने दोन्ही सामन्यांत नाणेफेक जिंकली. त्यामुळे परिस्थितीचा लाभ उठविण्याची संधी भारताला मिळाली. गोलंदाजांनी भेदक मारा केला, तर फलंदाजांनी टार्गेट पार करण्यात यश मिळविले. (IND vs NZ)
रोहितने ईडन गार्डनवरच वनडेमध्ये 264 धावांची खेळी केली आहे. यामुळे कर्णधार म्हणून पहिली मालिका जिंकल्यास कारकिर्दीतील आणखी एक मैलाचा दगड पार केल्यासारखे होणार आहे. तसेच प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचासुद्धा पहिला मालिका विजय ठरणार आहे.
क्लीन स्वीप केल्यास कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढणार आहे. तरीही शेवटच्या टी-20 सामन्यात रोहित आणि द्रविड ही जोडी आता राखीव खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे. सहावा गोलंदाज म्हणून वेंकटेश अय्यरचा वापर केला जाऊ शकतो. हुगली नदीपासून येणार्या वार्यांपासून चेंडूला स्विंग मिळणार आहे. यामुळे भुवी प्रभावी ठरू शकतो. तसेच ऋतुराज गायकवाड, आवेश खान, इशान किशन यांना ईडन गार्डनवर संधी मिळणे शक्य आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत फिरकी गोलंदाज आर. आश्विन हा संघासाठी प्रमुख अस्त्र ठरतोय. त्याने पहिल्या दोन सामन्यांत 23 आणि 19 धावा देत अनुक्रमे दोन आणि एक विकेट घेतली आहे. यामुळे आश्विन आता 'मालिकावीर'चा दावेदार बनला आहे.
न्यूझीलंडसाठी सुरुवात चांगली मिळत असली तरी त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश येत आहे. याशिवाय 15 ते 20 षटकांदरम्यान किवी फलंदाज भारताच्या भेदक मार्यासमोर निष्प्रभ ठरताना दिसत आहेत. तरीही शेवटचा सामना जिंकण्याचा न्यझीलंडचा संघ प्रयत्न करेल.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर आश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड : टीम साऊदी (कर्णधार), टॉड एस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅम्पेन, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, एडम मिल्ने, डॅरेल मिशेल, जिमी निशाम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सेंटनर, टीम सीफर्ट, ईश सोढी.
7 : एकूण सामने
2 : प्रथम फलंदाजी करणारा विजयी
5 : दुसर्यांदा फलंदाजी करणारा विजयी
142 : सरासरी धावा
5/201 : सर्वाधिक धावा (पाक)
70 : नीचांकी (बांगलादेश)
31 : प्रथम फलंदाजी करणारा विजयी
46 : दुसर्यांदा फलंदाजी करणारा विजयी
160: सरासरी धावा
2/232 ः सर्वोच्च धावसंख्या : केकेआर
49 : नीचांकी धावसंख्या : आरसीबी