Indonesia Masters 2021 : पी. व्ही. सिंधू, श्रीकांत यांचे आव्हान संपुष्टात | पुढारी

Indonesia Masters 2021 : पी. व्ही. सिंधू, श्रीकांत यांचे आव्हान संपुष्टात

जकार्ता ; वृत्तसंस्था : भारताची स्टार खेळाडू आणि दोनवेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिचे (Indonesia Masters 2021) इंडोनेशिया मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सेमीफायनलमध्ये सिंधूला जपानच्या अग्रमानांकित अकाने यामागुचीने पराभूत करत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. तर पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत याचेही आव्हान संपुष्टात आले.

यापूर्वी यामागुचीविरुद्ध सिंधूचे रेकॉर्ड 12-7 असे होते. तसेच यावर्षी झालेल्या दोन लढतींमध्ये सिंधूने यामागुचीला पराभूतही केले होते. मात्र, आज पी. व्ही. सिंधू तिच्याविरुद्ध विजय मिळवू शकली नाही. एकतर्फी झालेल्या 32 मिनिटांच्या लढतीत यामागुचीकडून सिंधूने 13-21, 9-21 असा पराभव स्वीकारला.

सिंधूने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत तुर्कीच्या बिगर मानांकित नेसलिहान यिजीटवर अवघ्या 35 मिनिटांत 21-13, 21-10 असा विजय मिळवत उपांत्यफेरी गाठली होती. मात्र, शनिवारी हाच विजयी फॉर्म सिंधू कायम राखू शकली नाही. दोन्ही गेममध्ये ती पिछाडीवर पडली. दुसर्‍या गेममध्ये काहीवेळ सिंधूने आघाडी घेतली होती. (Indonesia Masters 2021)

मात्र, त्यानंतर यामागुचीने सिंधूला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. पुरुष एकेरीत सेमीफायनलमध्ये किदाम्बी श्रीकांतला डेन्मार्कच्या अँडर्स अँटोरसन याने 21-14, 21-9 असे एकतर्फी पराभूत केले.अन्य लढतींमध्ये कपिला आणि सिक्की यांना मिश्र दुहेरीत पराभव स्वीकारावा लागला.

Back to top button