मेलबर्न; वृत्तसंस्था : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. तिसर्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसर्या डावात चार गडी गमावून 187 धावा केल्या होत्या. कांगारूंची आतापर्यंत एकूण 241 धावांची आघाडी झाली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 318 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा पहिला डाव 264 धावांवर आटोपला आणि कांगारूंना पहिल्या डावात 54 धावांची आघाडी मिळाली. जर पावसाने व्यत्यय आणला नाही तर या सामन्याचा निकाल जवळपास निश्चित मानला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची पकड मजबूत आहे. (AUS vs PAK Test)
ऑस्ट्रेलियाच्या दुसर्या डावाची सुरुवात काही खास नव्हती. संघाने 16 धावांत चार विकेटस् गमावल्या होत्या. उस्मान ख्वाजा आणि ट्रॅव्हिस हेड खातेही उघडू शकले नाहीत. त्याचवेळी डेव्हिड वॉर्नर 6 धावा करून बाद झाला तर मार्नस लॅबुशेन 4 धावा करून तंबूत परतला. यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल मार्श यांनी पाचव्या विकेटसाठी 153 धावांची भागीदारी केली. मार्शने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सातवे अर्धशतक झळकावले. त्याचे शतक हुकले आणि 130 चेंडूंत 13 चौकारांच्या मदतीने 96 धावा करून तो बाद झाला. याशिवाय स्टीव्ह स्मिथ 176 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 50 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तो बाद होताच दिवसाचा खेळ संपवण्याची घोषणा करण्यात आली. अॅलेक्स कॅरी 16 धावांवर नाबाद आहे. पाकिस्तानकडून मीर हमजा आणि शाहीन आफ्रिदीने प्रत्येकी तीन विकेटस् घेतल्या. (AUS vs PAK Test)
तत्पूर्वी, पाकिस्तान संघाने तिसर्या दिवशी 194 धावांवरून पहिला डाव पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि 70 धावा जोडल्यानंतर उर्वरित चार विकेटस् गमावल्या. रिझवान आणि जमालमध्ये 45 धावांची भागीदारी झाली. रिझवानला कमिन्सने वॉर्नरच्या हाती झेलबाद केले. त्याला 42 धावा करता आल्या. तर शाहीन आफ्रिदीने 21 धावांची खेळी केली. हसन अली आणि मीर हमजा प्रत्येकी दोन धावा करून पॅव्हेलियनमध्ये गेले. आमीर जमाल 33 धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार कमिन्सने पाच, तर लियॉनने चार विकेटस् घेतल्या. हेझलवूडला एक विकेट मिळाली.
हेही वाचा :