SA vs IND : दक्षिण आफ्रिकेचा विजयी एल्गार | पुढारी

SA vs IND : दक्षिण आफ्रिकेचा विजयी एल्गार

सेंच्युरियन; वृत्तसंस्था : दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे 31 वर्षांपासूनचे स्वप्न पुन्हा अधुरेच राहिले. दोन्ही संघांदरम्यान झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव केला. या विजयाने दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. (SA vs IND)

पहिल्या डावात 408 धावा करून 163 धावांची आघाडी घेतलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दुसर्‍या डावात टीम इंडियाचा खुर्दा केला. भारताचा डाव 34.1 षटकांत सर्वबाद 131 धावांवर गुंडाळला. विराट कोहलीने 76 धावांची झुंजार खेळी केली, मात्र कोहलीचा आणि गिल (26) चा अपवाद वगळता भारताच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गरने सर्वाधिक 4 विकेटस् घेतल्या तर मार्को येनसेनने 3 विकेटस् घेत अष्टपैलू कामगिरी केली. त्याने दुसर्‍या डावात नाबाद 84 धावांचे योगदान देखील दिले होते. 185 धावा करणार्‍या डीन एल्गरला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. (SA vs IND)

तिसर्‍या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 408 धावा केल्या. यानंतर भारताने दुसरा डाव सुरू केला. पहिल्या डावात भारतीय कर्णधार रोहित शर्माला (5) काही खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळे दुसर्‍या डावात रोहित चमकदार कामगिरी करून सामन्यात संघाचे पुनरागमन करेल, अशी आशा भारतीय चाहत्यांना होती. मात्र, पहिल्या डावाप्रमाणे दुसर्‍या डावात देखील भारतीय कर्णधार स्वस्तात बाद झाला. कगिसो रबाडा रोहितसाठी काळ ठरला अन् त्याने अप्रतिम चेंडू टाकून हिटमॅनचा त्रिफळा उडवला. रोहितपाठोपाठ यशस्वी जैस्वाल देखील बाद झाला असून जैस्वाल 18 चेंडूंत 5 धावा करून बाद झाला. भारताला हा दुसरा धक्का नांद्रे बर्गरने दिला. या धक्क्यातून सावरायच्या आत मार्को जान्सनने भारताला तिसरा धक्का देत शुभमन गिल (26) याचा त्रिफळा उडवला. चहापानाला खेळ थांबला तेव्हा भारताच्या 3 बाद 62 धावा झाल्या होत्या. चहापानानंतर भारताची अक्षरश: दाणादाण उडाली. मार्को जान्सनने श्रेयस अय्यरला देखील 6 धावांवर बाद करत भारताची अवस्था 4 बाद 72 धावा अशी केली.

भारताची रनमशिन विराट कोहलीने एक बाजू लावून धरत अर्धशतकी खेळी केली, मात्र त्याला साथ देणारे फलंदाज स्वस्तात माघारी गेले. गेल्या डावातील शतकवीर के.एल. राहुल दुसर्‍या डावात 4 धावा करून बाद झाला. तर अश्विनला खातेदेखील उघडता आले नाही. दोघांनाही नांद्रे बर्गरने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मार्को येनसेनने 76 धावा करून एकाकी झुंज देणार्‍या विराट कोहलीला बाद करत भारताचा दुसरा डाव 131 धावांत संपवला. याचबरोबर भारताचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव झाला.

तत्पूर्वी, तिसर्‍या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत भारताने दक्षिण आफ्रिकेला 408 धावांत गुंडाळले असून, यासह यजमानांनी भारतावर 163 धावांची आघाडी घेतली. आफ्रिकेकडून डीन एल्गरने सर्वाधिक 185 धावा केल्या तर मार्को जान्सनने 84 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक (4) बळी घेतले, तर मोहम्मद सिराजने (2) बळी घेऊन भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला. याशिवाय प्रसिद्ध कृष्णा, आर. अश्विन आणि शार्दूल ठाकूर यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले.

बुधवारी दुसर्‍या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने 66 षटकांत 5 गडी गमावून 256 धावा केल्या होत्या. यजमान संघानेे 11 धावांची आघाडी घेतली होती. मात्र, गुरुवारी यजमान संघाने स्फोटक खेळी करत 400 पार धावसंख्या नेली. आफ्रिकेने 108.4 षटकांत सर्वबाद 408 धावा केल्या आणि यासह यजमानांनी 163 धावांची आघाडी घेतली.

एल्गरला द्विशतकाची दुसर्‍यांदा हुलकावणी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत डीन एल्गरने दमदार फलंदाजी केली. त्याने 287 चेंडूंत 185 धावा ठोकल्या. त्याने चौथ्या आणि सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत संघाला 350 धावांच्या पार पोहोचवले. डीन एल्गरने दमदार फलंदाजी करूनदेखील त्याचे द्विशतक ठोकण्याचे स्वप्न काही पूर्ण होऊ शकले नाही. 185 धावांवर असताना शार्दूल ठाकूरने त्याला के.एल. राहुलकरवी झेलबाद केले. डीन एल्गरबाबत हे पहिल्यांदाच झालेले नाही. यापूर्वी एल्गरचे कसोटी द्विशतक अवघ्या 1 धावेने हुकले होते.

बांगला देश विरुद्ध एल्गर 199 धावांवर बाद

डीन एल्गरसोबत असे दुसर्‍यांदा झाले आहे. त्याचे दुसर्‍यांदा कसोटी क्रिकेटमधील द्विशतक हुकले आहे. 2017 मध्ये तो कसोटी सामन्यात 199 धावांवर बाद झाला होता. सप्टेंबर महिन्यात 2017 मध्ये बांगला देशविरुद्धच्या सामन्यात एल्गरने सलामीला येत 388 चेंडू खेळून त्याने 199 धावा केल्या होत्या. यात 15 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. मात्र त्याचे द्विशतक अवघ्या 1 धावेने हुकले होते. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 333 धावांनी जिंकला होता. (SA vs IND)

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव : 67.4 षटकांत सर्वबाद 245.
दक्षिण आफ्रिका पहिला डाव : 108.4 षटकांत सर्वबाद 408 (डीन एल्गर 185, डेव्हिड बेडिंगहम 56, मार्को जान्सन नाबाद 84. जसप्रीत बुमराह 4/69, मोहम्मद सिराज 2/91).
भारत दुसरा डाव : 34.1 षटकांत सर्वबाद 131. (शुभमन गिल 26, विराट कोहली 76. कॅगिसो रबाडा 2/32, नांद्रे बर्गर 4/33, मार्को जान्सन 3/36.)

हेही वाचा :

Back to top button