मुंबई; वृत्तसंस्था : एकमेव कसोटी सामना हरल्यानंतर ऑस्ट्रेलियन महिला संघाने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजयी सुरुवात केली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 6 विकेटस्नी विजय मिळवला. भारताने जेमिमाह रॉड्रिग्जच्या 82 धावांच्या खेळीच्या जोरावर 8 बाद 282 धावा केल्या होत्या; परंतु हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 4 विकेटस्च्या मोबदल्यात 21 चेेंडू शिल्लक ठेवून पार केले. फोबे लिचफिल्ड (78), एलिस पेरी (75) यांनी 148 धावांची भागीदारी करून विजयाचा पाया रचला. त्यानंतर बेथ मुनी (42) ताहिला मॅकग्राथ (68) यांनी 88 धावा जोडताना ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला. (INDw vs AUSw)
तत्पूर्वी, आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडला. पण, जेमिमाह रॉड्रिग्जने सावध खेळी करून भारताची धावसंख्या 250 पार नेली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताला सुरुवातीलाच तीन मोठे धक्के बसले. शेफाली वर्मा (1), ऋचा घोष (21) बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरला (9) बाद करण्यात पाहुण्या संघाला यश आले. पण, यास्तिका भाटियाने 49 धावांची खेळी करून डाव सावरला. (INDw vs AUSw)
यास्तिका बाद झाल्यानंतर मूळची मुंबईची असलेल्या जेमिमाहने चमकदार कामगिरी केली. तिने सात चौकारांच्या मदतीने 77 चेंडूंत 82 धावा कुटल्या. जेमिमाहच्या खेळीच्या जोरावर भारताला सन्मानजनक आव्हान उभारण्यात यश आले. जेमिमाहशिवाय पूजा वस्त्राकरने फलंदाजीत कमाल केली. तिने अखेरच्या काही षटकांमध्ये स्फोटक खेळी करून कांगारूंचा समाचार घेतला. सामन्यातील पहिला षटकार देखील पूजाच्याच बॅटमधून आला. पूजा वस्त्राकरने 46 चेंडूंत 2 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 62 धावा केल्या. भारताने निर्धारित 50 षटकांत 8 बाद 282 धावा केल्या असून पाहुण्या संघासमोर विजयासाठी 283 धावांचे आव्हान आहे. अॅश्ले गार्डनर आणि जॉर्जिओ वेअरहॅम यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले, तर डार्सी ब्राऊनस, मेगन स्कट, एन्नाबेल सदरलंड आणि अलाना किंग यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. टीम इंडिया उपकर्णधार स्मृती मानधनाच्या अनुपस्थित मैदानात उतरली. या सामन्यातून साइका इशाकने भारतीय संघात पदार्पण केले.
हेही वाचा :