Rohit Sharma : टी-20 वर्ल्डकपचे नेतृत्व रोहितकडेच? | पुढारी

Rohit Sharma : टी-20 वर्ल्डकपचे नेतृत्व रोहितकडेच?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारताच्या दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी गुरुवारी संघाची निवड झाली. या दौर्‍यात टीम इंडिया प्रत्येकी 3 सामन्यांची वन-डे आणि टी-20 मालिका, तर 2 सामन्यांची कसोटी मालिकादेखील खेळणार आहे. वर्ल्डकप 2023 नंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) प्रथमच मैदानावर दिसणार आहे. कसोटीचे नेतृत्व रोहितकडे असेल; पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित आणि विराट कोहली या दोघांना विश्रांती देण्यात आली आहे. (Rohit Sharma)

रोहित आणि विराट टी-20 फॉर्मेट खेळणार का? यावर चर्चा सुरू झाली आहे; पण बीसीसीआयच्या एक मेलने सर्वात मोठ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. बोर्डाच्या मते, रोहित आणि विराट हे टी-20 फॉर्मेट खेळतील. त्यांना फक्त आफ्रिका दौर्‍यासाठी ‘विश्रांती’ देण्यात आली आहे. या दोघांनी मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमधून विश्रांती मागितली होती, याचा अर्थ हे दोन्ही खेळाडू यापुढेही वन-डे आणि टी-20 चा भाग असतील, म्हणजेच टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित खेळणार हे निश्चित असून, देशाला ट्रॉफी मिळवूनच निवृत्ती घ्यायची त्याचा विचार असेल.

वर्ल्डकप 2023 मध्ये बांगला देशविरुद्धच्या लढतीत हार्दिक पंड्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो वर्ल्डकपमधून बाहेर झाला. इतकेच नाही, तर आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि त्यानंतर होणार्‍या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी तो संघातून बाहेर झाला आहे. हा वर्ल्डकप जर रोहितने जिंकला असता, तर तो टी-20 मध्ये खेळण्याची शक्यता फार कमी होती. यामुळे वर्ल्डकपमध्ये स्फोटक फलंदाजी करणार्‍या रोहित शर्माला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. (Rohit Sharma)

सूत्रांच्या माहितीनुसार, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2024 साली होणारा टी-20 वर्ल्डकप खेळणार होता; पण सध्याची परिस्थिती पाहता तसे होईल, असे वाटत नाही. बोर्डानेदेखील रोहित शर्माला टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर केल्याचे जाहीर केले नाही किंवा रोहितकडूनदेखील असे कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. काही माजी खेळाडू आणि एक्स्पर्टस्च्या मते, रोहित आणि विराट यांनी टी-20 संघात खेळू नयेत; पण काहींच्या मते, रोहितचे नेतृत्व पाहता तोच योग्य कर्णधार ठरू शकतो.

हेही वाचा : 

Back to top button