मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्येवर गुन्हा | पुढारी

मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्येवर गुन्हा

हैदराबाद; वृत्तसंस्था : तेलंगणातील 119 विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक आयोगाच्या अंतिम आकडेवारीनुसार, 70.61 टक्के मतदान झाले. गत 2018 मधील निवडणुकांच्या तुलनेत ते 2.76 टक्क्यांनी कमी आहे. गत निवडणुकीत 73.37 टक्के मतदान झाले होते. गुरुवारच्या मतदानादरम्यान बीआरएस नेते मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या के. कविता यांच्याविरुद्ध मतदान केंद्रात प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (Chief Minister KCR)

मतदानादरम्यान काही किरकोळ वादावादी व हाणामारीच्या घटनाही घडल्या. हैदराबादेतील चारमिनार विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार मुबीन यांच्यावर हल्ला झाला. नालगोंडातील जगतियल मतदारसंघात भाजप व बीआरएस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. वारंगलमध्ये मयलिवर गावात मंत्री एर्राबेली दयाकर यांना गावकर्‍यांनी रोखले. दयाकर समर्थक व ग्रामस्थांमध्ये धुमश्चक्री झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. आदिलाबाद मतदानाच्या रांगेत उभे असताना हृदयविकाराचा झटका आल्याने टोकला गंगम्मा (वय 78) आणि भोवळ येऊन पडल्याने राजन्ना (65) यांचा मृत्यू झाला. वारंगलमधील नारायण थंडा भागात बीआरएस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांना लाठीमार करावा लागला. (Chief Minister KCR)

चारमिनारच्या राज्यातील निवडणुकीची ही 4 वैशिष्ट्ये

1) मुख्यमंत्री केसीआर सलग तिसर्‍यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी रिंगणात असून, त्यासाठी गजवेल आणि कामारेड्डी या 2 जागांवरून त्यांनी निवडणूक लढवली.
2) भाजपची जनसेनासोबत युती असून, भाजपने आपल्या 3 खासदारांना उभे केले होते. बंदी संजय कुमार यांनी करिमनगरमधून, सोयाम बापू यांनी बोथमधून, अरविंद धर्मपुरी यांनी कोरुतलातून निवडणूक लढविली आहे.
3) काँग्रेसनेही 3 विद्यमान खासदार या निवडणुकीत उभे केले होते. कोदंडलमधून मलकाजगिरीचे खासदार ए. रेवंथ रेड्डी, नलगोंडामधून भोंगीरचे खासदार कोमातीरेड्डी व्यंकट रेड्डी आणि नलगोंडाचे खासदार एन. उत्तमकुमार रेड्डी हुजूरनगरमधून आमदारकीचे उमेदवार होते.
4) हैदराबाद जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीचे राजकारण असदुद्दीन ओवैसींभोवती फिरते. त्यांचा एआयएमआयएम हा पक्ष 9 जागांवर निवडणूक लढवत आहे.

मुस्लिम प्रभाव : आकडे बोलतात

  • 3.17 कोटी तेलंगणातील एकूण लोकसंख्या
  • 13 टक्के मुस्लिम मतदार
  • 10 जागांतून (हैदराबादमधील) 30 ते 50 टक्के मुस्लिम मतदार, तर 20 जागांवर 15 ते 30 टक्के मुस्लिम मतदार आहेत.
    15 जागांवर 10 ते 15 टक्के मुस्लिम मतदार आहेत.
  • 6 मुस्लिमांना काँग्रेसने, तर 4 मुस्लिमांना बीआरएसने उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा :

Back to top button